फायनान्शियल प्लॅनिंग मराठी । Financial Planning in Marathi

5/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

या लेखापासून आपण वैयक्तिक अर्थव्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत.

या लेखात आपण आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? । What is Financial Planning ?

फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजन म्हणजे आपली संपत्ती आणि आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या, आपले उत्पन्न आणि खर्च यांचा सुनियोजित ताळमेळ बसवणे होय.

फायनान्शियल प्लॅन आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा रोडमॅप होय.

आर्थिक नियोजनामध्ये आपल्या सद्यस्थितीचा अभ्यास करणे, आपली उद्दिष्टे ठरवणे आणि आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना तयार करणे यांचा समावेश होतो.

फायनान्शियल प्लॅनिंग हे अगदी एखाद्या कौटुंबिक सहलीला जाण्यासारखे आहे.

आपण कुठे आहोत हे आपल्याला माहित असते आणि आपल्याला कुठे जायचे आहे, म्हणजे सहलीचे ठिकाण आपल्याला ठरवावे लागते.

आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी निवडाव्या लागतात जसे की आपल्याला कधी पोहोचायचे आहे, किती लवकर जायचे आहे, प्रवासाचा मार्ग इ.

याशिवाय प्रवासादरम्यान चांगल्या-वाईट शक्यतांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल.

आपण रस्त्यावर कमी रहदारी असल्यास फायदा घेऊ शकतो आणि वेग वाढवू शकतो त्याचप्रमाणे खडबडीत रस्ता असल्यास आपल्याला वेग कमी करावा लागू शकतो.

त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही वाईट घडले तर आपले कुटुंब शेवटपर्यंत पोहोचले पाहिजे याची आपल्याला खात्री करणे आवश्यक आहे.

फायनान्शियल प्लॅनिंगची उद्दिष्टे । Objectives of Financial Planning

 • आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे

आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे हे फायनान्शियल प्लॅनिंगचे पहिले लक्ष्य आहे.

ही आर्थिक उद्दिष्टे आपल्याला आपली स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक रक्कम आपण ठरवायची आहे आणि त्यानुसार आपले बजेट तयार करायचे आहे.

बाईक विकत घेण्यासाठी आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक रक्कम बचत करणे हा फायनान्स प्लॅनचा एक भाग असू शकतो आणि काही महिन्यांनंतर आपल्याला बाईक घेण्यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होते.

अशा प्रकारे एक फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला हवे ते मिळवून देण्यासाठी मदत करते आणि आपले आयुष्य सोपे होते.

 • बचत वाढवा:

आर्थिक योजनेचा उद्देश आपली बचत वाढवणे आहे.

फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला आपण कष्टाने कमावलेले पैसे वाचवण्यासाठी मदत करते त्याचप्रमाणे आपली बचत पार्क करण्याचे सर्वोत्तम पर्याय देखील उपलब्ध करून देते.

 • निवृत्तीचे नियोजन:

वाढलेले आयुर्मान, वाढती महागाई, सरकारकडून निवृत्तीवेतन न मिळणे, विभाजित कुटुंबे, राहणीमानाचा वाढता खर्च इ. अशा विविध कारणांमुळेआपल्याला आपल्या निवृत्तीचे नियोजन करणे खरोखर महत्त्वाचे झाले आहे.

आपण कोणीही आयुष्यभर काम करू शकणार नाही तेव्हा आपण दुसरा कमाईचा मार्ग तयार करणे शहाणपणाचे ठरते.

 • संपत्ती सुरक्षित करणे

जीवन अप्रत्याशित आहे.

एक चांगली आर्थिक योजना आपल्याला आपल्या संपत्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मदत करते आणि आपल्या मालमत्तेचे रक्षण करते.

आपल्याला आपले तसेच आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित करणे आवश्यक आहे.

आरोग्यसेवा आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

आर्थिक योजनेद्वारे वस्तू जसे की उपकरणे, घर, बाईक, कार इत्यादींचे संरक्षण केले जाते.

 • संपत्ती निर्माण करणे

जर आपल्याला संपत्ती निर्माण करायची असेल तर आर्थिक योजना असणे आवश्यक आहे.

फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला नवनवीन संपत्तीचे स्रोत (Assets) तयार करण्यात आणि आपली दायित्वे (Liabilities)कमी करण्यात मदत करते.

आपल्या मालमत्ता आपल्या खिशात पैसे टाकतात याउलट दायित्वे आपल्याला खिशातून पैसे काढून घेतात.

 • कर्ज फेडणे

आपले फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला लवकर कर्जातून मुक्त होण्यास मदत करेल.

आपल्या हफ्त्यांची (EMI) सोयीस्कर परतफेड करण्याची हमी देईल.

फायनान्शियल प्लॅनिंग महाग कर्ज ओळखून लवकरात लवकर परतफेड करण्यास प्रवृत्त करेल.

आपल्या कर्जाची लवकर परतफेड झाल्यास मोठ्या प्रमाणात व्याजाची बचत होते म्हणून कर्जे वित्त योजनेच्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे.

 • पैशाचा प्रभावी वापर

फायनान्शियल प्लॅनिंग आपण कमावलेल्या प्रत्येक पैशाला आपल्यासाठी कामाला लावण्याची एक नियोजनबद्ध पद्धत आहे.

पैशासाठी काम करण्याऐवजी आपले पैसे आपल्यासाठी काम करतील आणि हे केवळ आर्थिक नियोजनातूनच शक्य आहे.

फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला अधिकाधिक पैसे कमावण्याच्या ओझ्यापासून देखील उसंत मिळवून देण्यात मदत करते.

फायनान्शियल प्लॅनिंगचे फायदे । Benefits of Financial Planning

 • खर्च करण्याचे स्वातंत्र्य:

आर्थिक नियोजनातून आपल्याला आपण किती रक्कम खर्च करू शकता हे कळते त्यामुळे खर्च करताना आपल्याला कोणतीही अडचण होणार नाही.

सर्व महत्त्वाच्या गोष्टीसाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला उर्वरित पैसे खर्च करण्याची किंवा गुंतवण्याची मुभा मिळते.

आपल्याकडे आर्थिक योजना असल्यास खरेदी आणि खर्च करताना आपल्याला व्दिधा मनस्थितीची त्रास होत नाही.

 • निधीची उपलब्धता:

एक ठोस आर्थिक योजना नेहमी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करते.

उदा. आपला प्लॅन जेव्हा आपण निवृत्तीनंतर किंवा उतार वयात काम करू शकणार नाही तेव्हा आपल्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करेल.

नोकरी गमावणे किंवा व्यवसायातील संकट यासारख्या दुर्दैवी घटनांची देखील तरतूद आर्थिक योजनेत करण्यात येईल.

 • आत्मविश्वासाने निर्णय घेणे

आर्थिक योजना तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देते.

योजनेमुळे आपल्यासमोर स्पष्ट परिभाषित उद्दिष्टे तयार होतात, आपल्याला फक्त आपल्या उद्दिष्टांच्या जवळ जाण्यासाठी हळू हळू प्रयत्न करत रहावे लागते.

प्लॅनिंग आपल्याला व्यत्ययांवर तोडगा काढण्यासाठी मदत करते आणि अनावश्यक प्रलोभनांपासून परावृत्त करते.

 • मनाची शांतता

आर्थिक योजनेत आपण गुंतवणुकीसाठी देखील योजना करत असतो तेव्हा आपण अगदी झोपत असाल तेव्हा देखील आपली मालमत्ता आणि गुंतवणूक आपल्यासाठी पैसे कमावत राहील.

तुमच्याकडे आर्थिक संकट किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असेल.

तुम्ही निवृत्त झाल्यावर तुमच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असेल.

या सर्व गोष्टी तुम्हाला शांत आणि निश्चित झोपू देतील.

खरं सांगू मित्रांनो, रात्री शांत झोपण्यासारखं क्वचितच दुसरं सुख आहे तेव्हा या लेखातील गोष्टींचा जरूर विचार करा.

 • प्रगतीचा मागोवा घ्या

जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या मार्गावर चालत राहण्यासाठी, वेळोवेळी तपासणी करत राहणे गरजेचे आहे.

फायनान्शियल प्लॅनिंगमुळे आपण आपल्या प्रगतीचे मुल्यांकन करू शकतो आणि आपण मार्गक्रमण करत असतांना भटकल्यास प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक हालचाली करू शकतो.

 • शिस्तबद्ध जीवन:

आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त अंगी बाणावी लागेल.

एक आर्थिक योजना आपल्याला आपल्या जीवनात एक शिस्त विकसित करण्यास मदत करते.

जर आपल्याला आपली स्वप्ने जगायची असतील तर आपल्याला स्वतःला सवयी लावून घेणे आणि अविचलित राहणे गरजेचे आहे आणि हे केवळ एका ठोस परंतु सोप्या-सुलभ योजनेमुळेच शक्य होऊ शकेल.

 • उत्तम जोखीम व्यवस्थापन

आर्थिक योजनेमुळे तुम्हाला तुमच्या मालमत्तेची आणि दायित्वांची पूर्ण जाणीव होते ज्यामुळे तुम्हाला सध्याच्या स्थितीनुसार तुम्ही किती धोका पत्करू शकता याची कल्पना येते.

निधीची गुंतवणूक करताना आणि कर्ज घेताना या सर्व गोष्टी उपयुक्त ठरतात.

आपल्या परिस्थितीची जाणीव आपल्याला क्षमतेपेक्षा जास्त जोखीम आणि क्रेडिट घेण्यापासून थांबवते याशिवाय आपला निधी गुंतवताना आपण किती आक्रमक असायला हवे हे आपण ठरवू शकतो.

 • कुटुंबाचे रक्षण:

आर्थिक नियोजन आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करते.

आपल्या कुटुंबाच्या शिक्षण, विवाह, आरोग्यसेवा आणि दुर्दैवी घटनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असतो.

 • स्वाभिमान

तुम्हाला पैशासाठी कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही.

तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांची चांगली काळजी देखील घेऊ शकाल.

तुम्ही इतर लोकांना मदत करण्यास सक्षम असाल आणि यामुळे आदर आणि प्रेम मिळण्यास पात्र व्हाल.

अशाप्रकारे आर्थिक नियोजन आपल्याला वित्तीय संस्था (उदा, बँक )आणि समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा देखील निर्माण करण्यास मदत करेल.

 • चांगले राहणीमान:

आर्थिक व्यवस्थापन केल्याने आपल्याला ब्रँडेड कपडे, दर्जेदार शिक्षण, आलिशान घर इत्यादी गोष्टी घेणे परवडू शकते.

तुम्ही तुमची आर्थिक योजना आखल्यास आणि शिस्तीने योजना राबविल्यास तुम्हाला जीवनातील अनेक सुखसोयी मिळतील.

तुमचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि राहणीमानाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या पैशाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

फायनान्शियल प्लॅनिंगची वैशिष्ट्ये । Characteristics of Financial Planning in Marathi

 • सुलभ

आपण आपली आर्थिक योजना शक्य तितकी सोपी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

योजनेसाठी कमीतकमी कागदपत्रे आवश्यक असावी तसेच रेकॉर्ड ठेवण्यासाठी सोपे असावे.

 • अंमलबजावणी

आपली आर्थिक योजना सहजतेने अंमलात आणण्यास योग्य असावी, योजना अंमलात आणणे कठीण असल्यास तिचा फायदा होणार नाही.

योजना व्यावहारिक आणि व्यवहार्य असावी.

आपण गुंतवणूक करण्यासाठी निवडत असलेली साधने खरेदी आणि विक्रीसाठी सोपी असावीत.

निधी सहज उपलब्ध होईल असे पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावे.

 • लवचिक

आपल्याला आपल्या योजनांमध्ये वेळेनुसार बदल करण्याची परवानगी मुभा मिळावी.

भरभराटीच्या काळात आपण आपली बचत आणि गुंतवणूक वाढवू शकतो आणि आणीबाणीच्या काळात आपला खर्च वाढल्यास आपल्या दीर्घकालीन योजनेवर त्याचा कमीत कमी प्रभाव पडावा.

 • किफायतशीर

योजना अमलात आणण्यासाठी किफायतशीर असावी.

योजना तयार करण्यासाठी अत्यंत स्वस्त आणि कार्यान्वित करण्यासाठी परवडणारी असावी.

उदा. स्टॉक एक्स्चेंजमध्ये फंड गुंतवताना कमीत कमी शुल्क आकारणारा ब्रोकर निवडणे. करमुक्त असलेली सेवानिवृत्ती योजना निवडणे, एजंट कमिशनशिवाय विमा खरेदी करणे इ.

आर्थिक योजनेचे घटक । Components of Financial Plan in Marathi

 • आर्थिक ध्येय
 • वर्तमान स्थिती
 • उत्पन्नाचा तपशील
 • खर्च
 • बचत धोरण
 • गुंतवणूक धोरण
 • विमा
 • कर व्यवस्था
 • कर्ज परतफेड योजना
 • आपत्कालीन निधी
 • सेवानिवृत्ती योजना

आपल्याला पैशाच्या व्यवस्थापनाविषयी आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.

मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

आपण वेळ काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment