मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Morning Star Candlestick Pattern in Marathi

5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो!!!

‘पैसा झाला मोठा’ च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे.

या लेखात आपण स्टार म्हणजे काय आणि मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नची सविस्तर चर्चा करणार आहोत.

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे असून बुलिश रिव्हर्सल सिग्नल आहे.

लेखाच्या शेवटी आपण मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर देखील बघणार आहोत आणि या पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करायचा ते देखील बघणार आहोत.

आपण जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करत असाल तर हा लेख जरूर वाचा

चला तर मग सुरुवात करूया.

स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न

सर्वात प्रथम आपण स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ते समजून घेऊया.

खालील चित्रात मी स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.

स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न | Star candlestick pattern

या पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या रंगाला महत्व नसल्याने मी चित्रातील कॅण्डलला रंग दिलेला नाही.

स्टार पॅटर्नचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे एका मोठ्या कॅण्डलनंतर तयार होणारी लहान कॅण्डल आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या कॅण्डल आणि लहान कॅण्डलमध्ये असणारा गॅप.

मोठया कॅण्डलनंतर तयार होणारी शॉर्ट कॅण्डल म्हणजेच स्टार कॅण्डल होय.

या दोन्ही कॅण्डलमध्ये गॅप-अप आणि गॅप-डाउन असे दोन्ही प्रकार आढळून येऊ शकतात.

चित्रात पहिल्या क्रमांकाने गॅप-डाउन स्टार तर दुसऱ्या क्रमांकाने गॅप-अप स्टार दाखवला आहे.

काही वेळा शॉर्ट कॅण्डल आपल्याला डोजी कॅन्डलच्या रूपात देखील बघायला मिळते अशा स्टार कॅण्डलला डोजी स्टार असे म्हणतात.

अशाप्रकारे आपण स्टार कॅण्डल म्हणजे काय ते माहित करून घेतले आता आपण मुख्य मुद्याकडे वळणार आहोत.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार

स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नचे खालील प्रमाणे विविध प्रकार पडतात

  • मॉर्निंग स्टार
  • इव्हनिंग स्टार
  • डोजी स्टार
  • शूटींग स्टार
  • अबँडण्ड बेबी

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न

मॉर्निंग स्टार म्हणजे शुक्रतारा होय.

आपल्याला माहित असेलच कि दिवसाची सुरुवात हि पहाटे दिसणाऱ्या शुक्रताऱ्यापासून होते. काळरात्र सरून पहाट होणे म्हणजे शुभसंकेतच नाही का ?

अगदी तशाच प्रकारे चार्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होणे म्हणजे शुभसंकेत होय.

खालील चित्रात मी मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.

morning star candlestick 1

आता आपण मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो ते बघणार आहोत.

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तीन कॅण्डलपासून तयार होत असतो म्हणूनच या कॅण्डलला ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न असे देखील म्हणतात.

चित्रात दाखवल्याप्रमाणे या पॅटर्नची सुरुवात एक मोठ्या बेअरिश कॅन्डलपासून होतो.

दुसरी कॅण्डल हि एक स्टार कॅण्डल म्हणजेच शॉर्ट कॅण्डल किंवा डोजी कॅण्डल तयार होते. अगोदरच सांगितल्याप्रमाणे दुसरी कॅण्डल हि एक गॅप-डाउन कॅण्डल असते.

तिसरी कॅण्डल हि एक मोठी बुलिश कॅण्डल असते.

तिसरी कॅण्डल हि गॅप-अप कॅण्डल असेलच असे नाही.

पहिली कॅण्डल हि बेअरिश कॅण्डल असल्याने तिचा रंग लाल आहे तर तिसरी कॅण्डल एक बुलिश कॅण्डल असल्याने हिरव्या रंगाची आहे.

मधली किंवा दुसरी कॅण्डल कोणत्याही रंगाची असली तरी चालते त्यामुळे मी दुसऱ्या कॅण्डलला रंग दाखवलेला नाही.

सध्या आपण मॉर्निंग कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतो कसा तेव्हढेच समजून घ्यायचे आहे, जसजसा आपण लेख पुढे वाचत रहाल तसतसे आपल्याला पॅटर्नचे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल.

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मागील मार्केटची मानसिकता

कोणताही कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरण्यापूर्वी तो पॅटर्न चार्टवर तयार होण्यामागील मार्केटची मानसिकता आपल्या लक्षात येणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय आपले निर्णय योग्य असू शकत नाही.

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे.

म्हणजेच हा पॅटर्न तयार होण्याआधी एक मोठा डाउनट्रेंन्ड असणे गरजेचे आहे.

पॅटर्न तयार होण्यापूर्वी किंवा पॅटर्न सुरु होत असतानाची मोठी लाल कॅण्डल बघता स्टॉकमध्ये बेअर्सचे पूर्ण नियंत्रण असल्याचे आपल्या लक्षात येते.

यानंतर स्टॉकची पुढील कॅण्डल गॅप-डाउन ओपन होते आणि हा देखील एक बेअरिश सिग्नल आहे मात्र सेशनच्या शेवटी कॅण्डल जेव्हा संपली तेव्हा एक शॉर्ट कॅण्डल तयार झाली आहे.

चार्टवर तयार झालेली शॉर्ट कॅण्डल बेअर्सचे स्टॉकमधील वर्चस्व कमी झाल्याचे दाखवते आहे कारण जर स्टॉक अजूनही बेअरिश असता तर अजून एक मोठी लाल रंगाची कॅण्डल तयार व्हायला हवी होती.

शॉर्ट कॅण्डल म्हणजे बुल्स आणि बेअर्स मधील लढाई बरोबरीत सुटल्याचे आपण म्हणू शकतो.

पहिल्या दोन कॅन्डलकडे बघता स्टॉकमधील डाउनट्रेंण्ड काही काळासाठी थांबला असल्याचे आपण म्हणू शकतो.

यानंतर स्टॉकमधील तिसरी कॅण्डल गॅप-अप ओपन झाली आहे जो एक स्टॉक बुलिश होत असल्याचे प्रतीक आहे.

यानंतर स्टॉक मध्ये एक मोठी हिरवी कॅण्डल तयार झाली आहे आणि बुल्स स्टॉक मध्ये परत आले आहे.

याशिवाय आपण तिन्ही कॅन्डलचा एकत्रितपणे विचार केल्यास हॅमर कॅण्डल तयार होत असल्याचे खालील चित्रात बघितल्यास आपल्या लक्षात येईल.

blended morning star candlestick

हॅमर कॅण्डल हा एक बुलिश कॅण्डल पॅटर्न असल्याचे आपण या अगोदरच्या लेखांतून बघितलेच आहे.

अशाप्रकारे फक्त कॅन्डलचा विचार केल्यास मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉक मध्ये अपट्रेन्ड सुरु होऊ शकतो असे आपण म्हणू शकतो.

आता आपण व्हॉल्युम आणि मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बघूया जेणेकरून आपल्याला ट्रेड घेण्यासाठी अजून जास्त आत्मविश्वास येईल.

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि व्हॉल्युम

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असतांना आपल्याला खालील व्हॉल्युम पॅटर्न आढळू शकतात.

चारही पॅटर्न आपण क्रमवार बघणार आहोत तेव्हा पुढे वाचत राहा.

volume pattern
  • जास्त बुलिश व्हॉल्युम: पहिल्या पॅटर्नमध्ये वाढणारा व्हॉल्युम स्टॉकमध्ये बुल्सचे जोरदार पुनरागमन होत असल्याचे सांगतो आहे.
  • मध्यम बुलिश व्हॉल्युम: दुसऱ्या व्हॉल्युम पॅटर्नमध्ये दुसरा व्हॉल्युम बार लहान तयार झाला असल्याने आपण कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही मात्र तिसऱ्या व्हॉल्युम बारचा वाढलेला व्हॉल्युम स्टॉकमध्ये बुलिश रिव्हर्सल होणार असल्यावर शिक्कमोर्तब करतो आहे.
  • कमी बुलिश व्हॉल्युम: तिसऱ्या व्हॉल्युम पॅटर्नमध्ये तिन्ही कॅन्डलचा व्हॉल्युम हळूहळू कमी होत आहे त्यामुळे स्टॉकची वाढलेली प्राइस पोकळ असण्याची शक्यता आहे.
  • मध्यम बुलिश व्हॉल्युम:चौथ्या पॅटर्नमध्ये दुसरा व्हॉल्युम बार तयार होईपर्यंत अनिश्चितता आहे आणि तिसरा व्हॉल्युम बार देखील पहिल्या म्हणजेच बेअरिश कॅन्डलच्या व्हॉल्युम पेक्षा कमीच असल्याने हा मॉर्निंग स्टार पॅटर्न खात्रीशीरपाने अपट्रेन्डची सुरुवात असेलच असे आपण म्हणू शकत नाही.

चार्टवर आपल्याला याव्यतिरिक्त देखील अनेक व्हॉल्युम पॅटर्न बघायला मिळू शकता.

व्हॉल्युम विषयी अधिक माहितीसाठी पैसा झाला मोठा ची व्हॉल्युम ऍनालिसिस लेखमाला आपण वाचावी असे मी सुचवतो.

आता आपण मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बघणार आहोत

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर

खाली आपल्या सोबत हिंदाल्को कंपनीचा डेली चार्ट आहे आणि चार्टवर मी मॉर्निंग कॅन्डलस्टिक चार्ट तसेच व्हॉल्युम मार्क केला आहे.

आपण बघू शकतो कि हिंदाल्को मध्ये बऱ्याच दिवसांपासून मजबूत डाउनट्रेंन्ड आहे.

चार्टवर एक डाउनट्रेंन्ड नंतर एक मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न सारखाच दिसणारा पॅटर्न तयार झाला आहे मात्र त्याचा व्हॉल्युम बुलिश नाही.

morning star on chart

त्यानंतर मात्र अगदी एखाद्या पुस्तकात असावा असा सुंदर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे आणि पॅटर्नमधील व्हॉल्युमचे बारीक निरीक्षण केल्यास आपल्याला स्टॉकमध्ये खरेदी सुरु झाल्याची खात्री करता येईल.

मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रेडींग

खाली हिंदाल्को कंपनीचेच उदाहरण मी मॉर्निंग कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा हे समजून सांगण्यासाठी केला आहे.

morning star candlestick entry and stop loss min

हिरव्या रंगाने मी एन्ट्री लेव्हल तर लाल रंगाने स्टॉप लॉस लेव्हल मार्क केल्या आहेत.

आपण एन्ट्रीसाठी पॅटर्नच्या बुलिश कॅन्डलच्या हाय प्राइस लेव्हलचा वापर करू शकता किंवा संपूर्ण पॅटर्नच्या हाय प्राइस लेव्हलचा देखील विचार करू शकता.

स्टॉप लॉस आपण स्टार कॅन्डलच्या लो प्राइस लेव्हल जवळ लावायचा आहे.

स्टॉक मधील व्होलॅटिलिटी किंवा स्प्रिंग टेस्टपासून स्टॉप लॉस सुरक्षित ठेवण्यासाठी स्टॉप लॉस शेवटच्या स्विंग लो जवळ देखील ठेवता येऊ शकतो.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण स्टार कॅन्डल आणि मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न यांची संपूर्ण माहिती घेतली.

लेखात दिलेल्या माहितीविषयी कोणतीही शंका असल्यास मला कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment