डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi

5/5 - (1 vote)

अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या शोधत असतात आणि अनेक लोकांची मूळ गुंतवणूक फक्त डिव्हिडंडमधूनच वसूल झाल्याचे माझ्या ऐकण्यात आहे.

म्हणजेच डिव्हिडंड हि गुंतवणूक करण्यापूर्वी नक्कीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट असल्याचे आपल्या लक्षात येते.

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपले स्वागत आहे.

या लेखात आपण डिव्हिडंडची माहिती घेणार आहोत.

शेअर मार्केटमध्ये काम करत असतांना आपल्याला अनेकदा डिव्हिडंड शब्द ऐकायला मिळतो तेव्हा डिव्हिडंड विषयी माहिती मिळवण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

चला तर मग सुरुवात करूया.

डिव्हिडंड म्हणजे काय ? । What is Dividend ?

डिव्हिडंड म्हणजे लाभांश होय.

डिव्हिडंड हा इंग्रजी शब्द असून लाभांश हा त्याला पर्यायी मराठी शब्द आहे.

कंपन्या आपल्या नफ्यातील काही हिस्सा कंपनीतील गुंतवणूकदारांना देतात त्यालाच आपण लाभांश किंवा डिव्हिडंड असे म्हणतो.

गुंतवणूकदारांनाच आपण शेअर मार्केटच्या भाषेत शेअर होल्डर्स असे म्हणतो.

उदा. अबक कंपनीला या वर्षी भरपूर नफा झाल्यास अबक कंपनी आपल्या सर्व शेअर होल्डर्सला आपल्या नफ्यातील काही हिस्सा लाभांश म्हणून वाटू शकते.

डिव्हिडंड जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रत्येक शेअरमागे ५ रुपये, १० रुपये, १५ रुपये असा कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे डिव्हिडंड मिळतो.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

लाभांश कसा जाहीर केला जातो ? । How Dividend is Announced ?

मित्रांनो, लाभांश जाहीर करतांना तो १००%, २००%, ५०० % असा जाहीर करतात.

लाभांश नेहमी शेअरच्या फेस व्हॅल्यूवर दिला जातो हे पक्के लक्षात असू द्या.

अनेकदा फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यांच्यामध्ये मोठा फरक असतो तेव्हा कंपनीचा डिव्हिडंड तपासत असतांना कंपनीची फेस व्हॅल्यूदेखील जरूर तपासून बघा.

उदा. टीसीएस कंपनीने ३० सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या इन्व्हेस्टर्सला ७००% डिव्हिडंड देणार असल्याचे जाहीर केले होते.

३० सप्टेंबर २०२१ रोजी टीसीएस कंपनीची मार्केट प्राइस होती जवळपास ३८०० रुपये.

बाप रे ! एवढा मोठा डिव्हिडंड.

थांबा थांबा. हा डिव्हिडंड टीसीएस कंपनीच्या फेस व्हॅल्यूवर जाहीर झाला आहे आणि टीसीएस शेअरची फेस व्हॅल्यू आहे १ रुपया.

म्हणजेच टीसीएस कंपनीच्या प्रत्येक शेअरमागे गुंतवणूकदारांना १*७००%=७ रुपये मिळाले.

कधी कधी कंपन्या गुंतवणुकदारांना पैसे न देता डिव्हिडंड म्हणून आणखी शेअर्सदेखील देते.

आता कंपनी लाभांश देते त्याचा गुंतवणूकदारांना कसा फायदा होतो हे आपल्या लक्षात येते पण कंपनीला याचा फायदा कसा होत असेल बरं

चला बघूया

डिव्हिडंड का दिला जातो ?

कंपन्या आपल्या सध्याच्या गुंतवणूकदारांना खुश ठेवण्यासाठी डिव्हिडंड देतात.

शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याचे विविध मार्ग आहेत त्यापैकी शेअर्सची देवाण-घेवाण म्हणजेच ट्रेडींग करून आपण पैसे कमवू शकतो.

शेअर मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास आपले पैसे कंपाऊंडिंगद्वारे वाढत जातात.

याशिवाय आपण गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला डिव्हिडंड मिळाल्यास जास्तीचा फायदा मिळतो असे आपण म्हणू शकतो.

कंपन्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी डिव्हिडंड देतात.

एखादी कंपनी डिव्हिडंड देते म्हणजे कंपनी भरपूर फायदा कमावत असल्याचे समजले जातात.

अशाप्रकारे डिव्हिडंड दिल्यामुळे कंपनीची मार्केटमधील प्रतिमा सुधारण्यास मदत होते.

गुंतवणूकदार अशा खात्रीशीर ठिकाणी गुंतवणूक करणे पसंत करतात.

यामुळेच फंडामेंटल ॲनालिसीसमध्ये कंपनी डिव्हिडंड देते कि नाही हे देखील बघितले जाते.

गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश म्हणजे त्यांनी आपले पैसे कंपनीत गुंतवून कंपनीविषयी दाखवलेली निष्ठा आणि विश्वास यांचा मोबदला असतो.

लाभांशाचे प्रकार

लाभांशाचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

  • हंगामी लाभांश (Interim Dividend)
  • वार्षिक लाभांश (Final Dividend)

हंगामी लाभांश (Interim Dividend)

अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना आपल्या तिमाही, सहामाही निकालांच्या वेळी देखील डिव्हिडंड जाहीर करत असतात या डिव्हिडंडला हंगामी लाभांश (Interim Dividend) असे म्हणतात.

आता आपण इन्फोसिस कंपनीचे डिव्हिडंडचे उदाहरण बघूया.

dividend

मित्रांनो, सोबतच्या चित्रात इन्फोसिस कंपनीने २६ ऑक्टोबर २०२१, २३ ऑक्टोबर २०२० आणि २३ ऑक्टोबर २०१९ रोजी हंगामी बोनस जाहीर केल्याचे आपण बघू शकतो.

तसेच ३१ मे २०२१, २९ मे २०२० रोजी वार्षिक डिव्हिडंड जाहीर केला आहे.

खालील लिंकवर क्लिक करून आपण इन्फोसिस कंपनीचे पूर्ण डिव्हिडंड रेकॉर्ड चेक करू शकतात.

इन्फोसिस

हंगामी डिव्हिडंड जाहीर करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्याची गरज नसते.

कंपनी वर्षातून एकापेक्षा जास्त वेळी देखील हंगामी डिव्हिडंड जाहीर करू शकते.

वार्षिक लाभांश (Final Dividend)

गुंतवणूकदारांना वार्षिक लाभांश नावातच सांगितल्याप्रमाणे वर्षातून एकदा दिला जातो.

वार्षिक लाभांश देण्यासाठीचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करून घ्यावा लागतो.

इन्फोसिस कंपनीने दिलेला फायनल डिव्हिडंड आपण सोबतच्या चित्रात बघू शकतात.

लाभांश आणि कर

लाभांश हा एक प्रकारे कमाई करण्याचा प्रकार असल्याने लाभांश आणि त्यावर आपल्याला द्यावा लागणार कर हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे.

२०२० पूर्वी शेअर होल्डर्सला मिळणारा लाभांश करमुक्त होता मात्र १ एप्रिल २०२० पासून नव्या कर धोरणानुसार शेअर होल्डर्सला मिळणाऱ्या लाभांशावर देखील कर दयावा लागणार आहे.

आपल्याला आयकर किंवा इन्कम टॅक्स भरतांना इतर उत्पनाच्या साधनामध्ये डिव्हिडंडद्वारे मिळालेले उत्पन्न दाखवून आपण आयकराच्या ज्या कक्षेत येतो त्याप्रमाणे डिव्हिडंड वर टॅक्स द्यावा लागणार आहे.

लाभांश कसा मिळतो ?

लाभांश जाहीर झाल्यानंतर आपली लाभांशाची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते.

आपले ट्रेडींग अकाउंट ज्या बँक अकाउंटशी लिंक आहे त्या बँक अकाउंटमध्ये आपली डिव्हिडंडची रक्कम जमा होते.

लाभांशाच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी ?

१. डिव्हिडंड जाहीर झाल्याची तारीख । Dividend Announcement Date

ज्या दिवशी कंपनी डिव्हिडंड देणार असल्याची तारीख जाहीर करते त्या दिवसाला डिव्हिडंड अनाऊन्समेन्ट डेट किंवा डिक्लेरेशन डेट म्हणतात.

२. एक्स-डिव्हिडंड डेट । Ex-Dividend Date

एक्स-डिव्हिडंड डेट हि एक अशी तारीख असते ज्या तारखेला शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा असणे गरजेचे आहे.

३. रेकॉर्ड डेट । Record Date

रेकॉर्ड डेटच्या दिवशी कंपनी आपल्या शेअर होल्डर्सपैकी जे शेअर होल्डर्स डिव्हिडंड मिळण्यास पात्र आहेत त्या शेअर होल्डर्सची यादी निश्चित करते.

यावरून आपल्या लक्षात येते कि रेकॉर्ड डेटपूर्वी डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये असणे गरजेचे आहे.

आपल्याकडे शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी टी +२ अशी पद्धत आहे म्हणजे ट्रेड किंवा शेअर्स घेतल्यानंतर ते दिवसांनंतर आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात.

४. पेमेन्ट डेट । Payment Date

ज्या दिवशी डिव्हिडंड आपल्या खात्यात जमा होतो त्या दिवसाला पेमेन्ट डेट म्हणतात.

उदा. टिसीएस कंपनीने १९ नोव्हेंबर २०२१ रोजी ५००% डिव्हिडंड.

मित्रांनो, अशाप्रकारे या लेखात आपण डिव्हिडंड किंवा लाभांश या संकल्पनेची सविस्तर माहिती घेतली.

लाभांश देणे न देणे हे सर्वस्वी कंपनीच्या व्यावस्थापनाच्या हातात असते.

थोडक्यात काय तर कंपनीने गेल्या वर्षी डिव्हिडंड दिला म्हणून आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि त्यानंतर कंपनीने डिव्हिडंड न दिल्यास आपल्याला चकित होण्यासारखे काहीही नाही.

शक्यतो जुन्या, प्रस्थापित, कर्ज नसणाऱ्या कंपन्या डिव्हिडंड देतात.

ज्या कंपन्यांना पुरेसा नफा झालेला नाही किंवा कर्ज आहेत अशा कंपन्या डिव्हिडंड देण्याची शक्यता कमी असते याशिवाय ज्या कंपन्यांचा आपला व्यावसाय वाढविण्याचा विचार आहे त्या कंपन्या डिव्हिडंड देत नाही.

आपल्याला सध्याचे कोणतेही डिव्हिडंड जाहीर झाल्याची माहिती हवी असल्यास आपण खालील लिंकवर क्लिक करू शकतात.

डिव्हिडंड

शेअर मार्केटविषयी अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ची लिंक बुकमार्क करा, आणि ‘पैसा झाला मोठा’ ॲप डाउनलोड करा.

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपण सवड काढून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment