नमस्कार मंडळी,
‘पैसा झाला मोठा’च्या नवीन लेखात आपलं स्वागत आहे.
या लेखात आपण इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बेअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
हा एक ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे कारण तो तीन कॅन्डलस्टिक पासून तयार होतो.
लेखाच्या सुरवातीला इव्हनिंग स्टार पॅटर्न विषयी माहितीची चर्चा केली असून शेवटी आपण चार्टवर पॅटर्न बघणार आहोत याशिवाय ट्रेडींगसाठी या पॅटर्नचा वापर कसा करावा, एन्ट्री कशी घ्यावी, स्टॉप लॉस कुठे ठेवावा या गोष्टी देखील बघणार आहोत तेव्हा हा संपूर्ण लेख वाचा.
आपण इंट्राडे ट्रेडर असाल, स्विंग ट्रेडर असाल किंवा शेअर मार्केट शिकत असाल, टेक्निकल ॲनालिसिस शिकत असाल तर या माहितीचा आपल्याला शंभर टक्के फायदा होईल.
चला तर मग सुरुवात करूया.
स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न
सर्वात प्रथम आपण स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ते समजून घेऊया.
खालील चित्रात मी स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.
या पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या रंगाला महत्व नसल्याने मी चित्रातील कॅण्डलला रंग दिलेला नाही.
स्टार पॅटर्नचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे एका मोठ्या कॅण्डलनंतर तयार होणारी लहान कॅण्डल आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या कॅण्डल आणि लहान कॅण्डलमध्ये असणारा गॅप.
मोठया कॅण्डलनंतर तयार होणारी शॉर्ट कॅण्डल म्हणजेच स्टार कॅण्डल होय.
या दोन्ही कॅण्डलमध्ये गॅप-अप आणि गॅप-डाउन असे दोन्ही प्रकार आढळून येऊ शकतात.
चित्रात पहिल्या क्रमांकाने गॅप-डाउन स्टार तर दुसऱ्या क्रमांकाने गॅप-अप स्टार दाखवला आहे.
काही वेळा शॉर्ट कॅण्डल आपल्याला डोजी कॅन्डलच्या रूपात देखील बघायला मिळते अशा स्टार कॅण्डलला डोजी स्टार असे म्हणतात.
अशाप्रकारे आपण स्टार कॅण्डल म्हणजे काय ते माहित करून घेतले आता आपण मुख्य मुद्याकडे वळणार आहोत.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो ?
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक तीन कॅण्डल पासून तयार होणार पॅटर्न आहे म्हणजेच ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
खालील चित्रात मी इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.
चित्रात प्रत्येक कॅण्डलला समजावून सांगण्यास मदत व्हावी म्हणून क्रमांक दिला आहे.
पहिल्या क्रमांकाची कॅण्डल एक मोठी हिरवी कॅण्डल आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कॅण्डल एक स्टार कॅण्डल आहे
तिसऱ्या क्रमांकाची कॅण्डल एक मोठी लाल कॅण्डल आहे
लाल कॅण्डल सर्वसाधारणपणे हिरव्या कॅन्डल बॉडीमध्ये ५०% पेक्षा अधिक खोलवर येऊन क्लोझ झाल्यास हा पॅटर्न ओळखण्यास आपल्याला अधिक सोपे जाते.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मागील मार्केटची मानसिकता
इव्हनिंग स्टार म्हणजे मावळतीचा तारा असे आपण म्हणू शकतो.
नावातच नमूद केल्याप्रमाणे इव्हनिंग स्टार हा एक अशुभ संकेत किंवा मंदीचा संकेत आहे.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठेही तयार होऊन चालत नाही.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बेअरिश रिव्हर्सल पॅटर्न असून तो एका मोठ्या अपट्रेन्ड नंतर तयार झाल्यास आपण आता ट्रेण्ड रिव्हर्स होऊ शकतो असे म्हणू शकतो.
पॅटर्नची सुरुवात एका मोठ्या हिरव्या कॅन्डलने झाली आहे.
हिरवी कॅण्डल आणि अगोदरचा असणारा अपट्रेन्ड स्टॉकमध्ये अजूनपर्यंत बुल्सचे पूर्ण वर्चस्व असल्याचे दाखवतो आहे.
दुसरी कॅण्डल हि एक शॉर्ट कॅण्डल किंवा लहान कॅण्डल तयार झाली आहे.
चार्टवर तयार होणारी शॉर्ट कॅण्डल आपल्याला हे सांगते आहे कि मार्केटमध्ये बुल्सने जी आघाडी घेतली होती त्या आघाडीला आता बेअर्स कडाडून विरोध करत आहे.
मार्केटमधील बुल्सचा प्रभाव कमी होतो आहे आणि स्टॉक मधील बुल्सची पकड सैल होते आहे.
चार्टवर तयार होणारी शॉर्ट कॅण्डल हि व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन आणि बुल्स–बेअर्स मधील रस्सीखेच दाखवते आहे.
यानंतर तयार होणारी तिसरी कॅण्डल हि एक लाल रंगाची म्हणजेच बेअरिश कॅण्डल आहे.
कॅन्डलची क्लोझिंग हिरव्या कॅन्डलच्या बॉडीमध्ये पुरेशी खोलवर झालेली दिसते आहे.
तिसरी लाल कॅण्डल आपल्याला हे सांगते आहे कि स्टॉकमध्ये हळूहळू नियंत्रण बेअर्सकडे जात आहे.
स्टॉकमध्ये वरच्या किमतीला मागणी घटते आहे आणि त्यामुळे स्टॉकची किंमत कमी व्हायला सुरुवात होते आहे.
अशाप्रकारे इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बुल्स कडून मोमेन्टम बेअर्सकडे जाण्याचा प्रवास आहे.
मित्रांनो, आता जेव्हा चार्टवर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो तेव्हा आपल्याप्रमाणेच इतर ट्रेडर्सच्या मनात काय मानसिकता तयार होते ते आपण समजून घेऊया आणि हेच या पॅटर्न यशस्वी होण्यामागील रहस्य आहे.
आपण असे समजूया कि अगोदरच्या दिवशी डेली टाइमफ्रेम चार्टवर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला होता.
पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी मार्केटमध्ये अपट्रेन्ड असतांना खरेदी केली आहे, ते लोक आता बेअरिश सिग्नल मिळाल्याने आपली होल्डिंग विक्रीस काढतात.
दुसरी गोष्ट म्हणजे इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बघताच अनेक ट्रेडर्स स्टॉकमध्ये नवीन शॉर्ट पोझिशन घ्यायला सुरुवात करतात.
तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ट्रेडर्सचे स्टॉप लॉस हिरव्या कॅन्डलच्या लो लेव्हलला असतात त्या ऑर्डर स्टॉकमधील बेअरिश ट्रेण्डला अजून जास्त बळकटी देतात.
याशिवाय आपण मोठ्या टाईमफ्रेमवर बघितल्यास आपल्याला इन्व्हर्टेड हॅमरप्रमाणे दिसणारी अशी काहीशी कॅण्डल तयार झाल्यासारखी दिसेल.
आपल्याला नेहमी अभ्यास करतांना कॅण्डलच्या पॅटर्नला महत्व देण्यापेक्षा त्यामागील मानसिकतेला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्टॉकमधील स्मार्ट मनी आणि ट्रेडर्सची मानसिकता समजून घेतांना आपल्याला व्हॉल्युमची खूप मदत होते तेव्हा आता आपण व्हॉल्युमचा अभ्यास करूया.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि व्हॉल्युम
आपल्याला जर ट्रेडींगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला व्हॉल्यूमची पुरेशी समज असणे खूप गरजेचे आहे.
खाली मी इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत बघायला मिळू शकतील असे काही व्हॉल्युम पॅटर्न दाखवले आहे.
पहिल्या व्हॉल्युम पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो कि व्हॉल्युम वाढतो आहे मात्र स्टॉकची प्राइस सुरवातीला स्थिर झाली आहे आणि नंतर मात्र घसरली आहे.
पहिल्या पॅटर्नकडे बघता आपण म्हणू शकतो कि वाढणारा व्हॉल्युम स्टॉकमध्ये सेलर्स येत असल्याचे सांगतो आहे.
दुसऱ्या क्रमांकाचा पॅटर्न व्हॉल्युम हा देखील स्टॉकमध्ये पुरेसे सेलर्स असल्याचे दर्शवतो आहे म्हणजेच इथून पुढे स्टॉकची किंमत खाली घसरण्याची दाट शक्यता असल्याचे सांगतो आहे.
तिसऱ्या व्हॉल्युम पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो कि व्हॉल्युम कमी होत आहे आहे आणि स्टॉकची प्राइस देखील सुरवातीला स्थिर झाली आहे आणि नंतर मात्र कमी झाली आहे.यावरून आपण म्हणू शकतो कि स्टॉकची किंमत कमी होत असली तरी व्हॉल्युम कमी असल्याने बेअर्सची डाउनट्रेंन्ड मधील ताकद स्टॉकची किंमत खाली ढकलण्याइतकी भक्कम नाही.
चौथ्या क्रमांकाच्या व्हॉल्युम पॅटर्नमध्ये लाल कॅन्डलचा व्हॉल्युम अजूनही हिरव्या कॅन्डलपेक्षा कमीच असल्याने स्टॉकमध्ये बेअर्स अजूनही ताकदवान नसल्याचे स्पष्ट होते अशावेळी आपल्याला कन्फर्मेशनसाठी वाट बघण्याची गरज असते.
शेअर मार्केटमध्ये शक्यता अगणित आहेत मात्र या व्हॉल्युम पॅटर्नच्या अभ्यासातून आपल्याला स्टॉककडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार व्हावा हा एकच उद्देश आहे.
आपल्या अभ्यासासाठी मी आणखी काही व्हॉल्युम पॅटर्न देत आहे.
आपण वरील पॅटर्नचा अभ्यास करून आपले निरीक्षण कमेन्ट बॉक्समध्ये नोंदवायचे आहे.
आता आपण इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बघणार आहोत.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर
खाली चार्टवर मी इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न दाखवला आहे.
आपल्यासोबत ग्रासिम कंपनीचा ५ मी टाइमफ्रेमचा कॅन्डलस्टिक आणि व्हॉल्युम चार्ट आहे.
आपण बघू शकतो कि ग्रासिम कंपनीचा स्टॉक अपट्रेन्डमध्ये असताना चार्टवर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे आणि स्टॉकची किंमत घसरायला सुरुवात झाली आहे.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताच मग आपण एन्ट्री घ्यायची का ? तर नाही आपल्याला व्हॉल्युमचे कन्फर्मेशन भेटल्यास लगेच एन्ट्री घ्यायची किंवा ट्रेण्डची अजून जास्त खात्री होईपर्यंत वाट बघायची.
आपण चार्टवर बघू शकतो कि इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार झाला असला तरी लाल कॅन्डलचा व्हॉल्युम तितकासा जास्त नाही त्यामुळे स्टॉक मध्ये आलेली डाउनमूव्ह सावकाश आली आहे तसेच आलेली डाउनमूव्ह अपमूव्हच्या तुलनेत कमजोर आहे.
आपण आता इतर चार्टवर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधून त्यानंतर स्टॉकमध्ये काय घडले त्याचा अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला ट्रेड घेण्यापूर्वी स्टॉकमधील मानसिकता अधिकाधिक जास्त स्पष्ट होऊ शकेल.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा.
मी इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा हे सांगण्यासाठी ग्रासिम कंपनीच्याच चार्टची मदत घेतली आहे.
चार्टवर लाल रंगाने मी स्टॉप लॉस लेव्हल तर हिरव्या रंगाने एन्ट्री लेव्हल दाखवली आहे.
चार्टवर पॅटर्न तयार झाल्यानंतर लाल कॅन्डलची क्लोझिंग प्राइस आणि व्हॉल्युमचे कन्फर्मेशन भेटल्यास आपण लगेचच एन्ट्री घेऊ शकतो.
स्टॉपलॉससाठी मी पॅटर्नची हाय प्राइस किंवा मधल्या शॉर्ट कॅण्डलच्या हाय प्राइसचा वापर करण्याचा सल्ला देईल.
आपल्याला खात्री नसल्यास आपण डाउनसाइडला व्हॉल्युम वाढण्याची वाट बघायची आहे किंवा पॅटर्नजवळ आणखी काही बेअरिश सिग्नल तयार होत आहेत का याचे निरीक्षण करायचे आहे.
इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न रेझिस्टन्स लेव्हल जवळ तयार झाल्यास आपल्याला ट्रेड करणे अजून जास्त खात्रीलायक आणि सोपे होते अशावेळी आपण रेझिस्टन्स लेव्हलच्या खाली शॉर्ट साइड एन्ट्री घ्यावी आणि स्टॉप लॉस रेझिस्टन्स लेव्हलच्या थोडासा वर लावावा.
मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नची सविस्तर माहिती घेतली.
लेखात दिलेल्या माहितीविषयी कोणतीही शंका असल्यास मला कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.
अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला लाइक करा, इन्स्ट्राग्राम वर फॉलो करा.
मला आशा आहे या लेखातून आपल्या माहितीत भर पडली असेल, आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद!!!
- कॅन्डलस्टिक चार्ट आणि कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? मराठी | What is Candlestick Chart & Candlestick in Marathi
- हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Hammer Candlestick Pattern in Marathi
- एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Engulfing Candlestick Pattern in Marathi
- डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi
- पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi
- बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern
- बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern in Marathi
- कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi
- शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi
- थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi
- थ्री ब्लॅक क्रोझ मराठी | Three Black Crows in Marathi
- डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Doji Candlestick Pattern in Marathi
- मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Morning Star Candlestick Pattern in Marathi
- इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Evening Star Candlestick Pattern in Marathi
- बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Bearish Tasuki Lines Candlestick Pattern in Marathi