निकोलस डरवास मराठी | Nicolas Darvas in Marathi

5/5 - (1 vote)

आपण जर शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर आपण डरवास बॉक्स थेअरी हे शब्द नक्कीच ऐकले असतील.

निकोलस डरवास हे एक ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि लेखक होते

निकोलस डरवास आपल्या “हाव आय मेड $२०,००,००० इन स्टॉक मार्केट (मी शेअर बाजारात २०,००,००० डॉलर्स कसे कमावले)” पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत.

निकोलस डरवास यांनी डरवास बॉक्स या प्रसिद्ध ट्रेडिंग पद्धतीचा शोध लावला असून आजदेखील अनेक ट्रेडर्स या पद्धतीचा अभ्यास आणि वापर करतात.

निकोलस डरवास हे अपघातानेच शेअर मार्केट मध्ये आले होते म्हणून त्यांना ॲक्सिडेंटल ट्रेडर असेही म्हणतात.

असे असले तरी निकोलस डरवास यांना शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ट्रेडर्सपैकी एक मानले जाते.

चला तर मग आज बघूया निकोलस डरवास यांचा जीवनप्रवास

निकोलस डरवास यांचा जन्म आणि मृत्यू

निकोलस डरवास यांचा जन्म ०१ जानेवारी १९२० रोजी झाला तर ०१ जानेवारी १९७७ रोजी त्यांना जगाचा निरोप घेतला

निकोलस डरवास यांचा मृत्यू पॅरिस येथे झाला तेव्हा त्यांचे वय होते ५७ वर्षे.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

निकोलस डरवास यांचे सुरवातीचे जीवन

निकोलस डरवास हे जन्माने हंगेरियन होते आणि सुरवातीला हंगेरीतच वास्तव्यास होते.

डरवास यांनी बुडापेस्ट विद्यापीठात अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले होते.

निकोलस डरवास पेशाने एक नर्तक किंवा डान्सर होते.

जून १९४३ मध्ये हंगेरी, नाझी किंवा सोव्हियत युनियनच्या ताब्यात गेल्यानंतर निकोलस वयाच्या २३ व्या वर्षी,बनावट व्हिसा आणि पन्नास पाउंड स्टर्लिंगसह तुर्कीला पळून गेले.

तुर्कीमध्ये निकोलस इस्तंबूल इथे राहिले.

निकोलस डरवास पुढे आपल्या सावत्र बहिणीला, ज्युलियाला भेटले.

ज्युलिया नंतर निकोलस यांची यूरोप आणि अमेरिकेतील डान्स प्रोग्रॅम मधील एक सहकारी बनली

पुढे त्या दोघांनी ज्युडी गारलँड आणि बॉब होपसोबत देश-विदेशात नृत्य समारंभासाठी अनेक दौरे केले.

निकोलस डरवास प्रकाश झोतात येण्याचं कारण म्हणजे टाइम मॅगझीन मध्ये त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेला पानभर लेख ज्यात त्यांनी सांगितलं होत कि कसे एका पेशाने डान्सर असलेल्या व्यक्तीने शेअर बाजारात केवळ १८ महिन्यात २०,००,००० डॉलर्स कमावले.

निकोलस डरवास यांचा एक यशस्वी ट्रेडर म्हणून प्रवास अतिशय प्रेरणादायी असून प्रत्येकाने वाचण्यासारखा आहे.

निकोलस डरवास यांची शेअर मार्केटशी ओळख

निकोलस डरवास यांची शेअर मार्केटशी ओळख कशी झाली ते आता आपण बघूया.

१९५२ साल होते, निकोलस डरवास यांचा न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन शहरातील लॅटिन क्वार्टरमध्ये डान्सचा कार्यक्रम चालू होता कार्यक्रमाला टोरंटो क्लबचे मालक स्मिथ ब्रदर्स देखील हजर होते.

स्मिथ ब्रदर्स कडून निकोलस यांना आपल्या टोरंटो क्लब येथे नृत्य सादर करण्यासाठी प्रस्ताव आला.

कार्यक्रमाचे मानधन म्हणून स्मिथ ब्रदर्स यांनी डरवास याना ब्रिलंड कंपनीचे शेअर्स देऊ केले.

ब्रिलंड एक कॅनेडियन मायनिंग फर्म होती.

डरवास यांना सुरवातीला हि ऑफर जरा विचित्र वाटली पण नंतर त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारली.

काही कारणांमुळे निकोलस टोरोंटो क्लबमध्ये कार्यक्रम करू शकले नाही त्यामुळे त्यांना अपराधी वाटू लागले.

आपल्या अपराधीपणाच्या भावनेतून त्यांनी स्मिथ ब्रदर्सकडे ब्रिलंड कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यावेळी ब्रिलंड कंपनीच्या शेअरचा भाव होता ५० सेंट्स, स्मिथ ब्रदर्स यांनी निकोलस यांना ३००० डॉलर्सचे ब्रिलंड कंपनीचे ६००० शेअर्स विकले.

अशाप्रकारे निकोलस डरवास यांची शेअर मार्केटमधील प्रवासाला सुरुवात झाली.

निकोलस डरवास यांचा जगप्रसिद्ध ट्रेडर म्हणून प्रवास

पुढे बरेच दिवस निकोलस डरवास आपल्या कामात व्यस्त होते.

जवळपासमहिन्यानंतर एके दिवशी वर्तमानपत्र वाचत असतांना त्यांची नजर ब्रिलंड कंपनीच्या बातमीकडे गेली.

बातमीत ब्रिलंड कंपनीच्या शेअरची किंमत लिहिली होती आणि किंमत होती १.९० डॉलर्स प्रति शेअर.

बातमी वाचताच निकोलस यांना आपल्याजवळील ब्रिलंड कंपनीच्या ६००० शेअर्सची आठवण झाली जे त्यांनी फक्त ०.५० सेंट्स प्रति शेअर ला स्मिथ ब्रदर्स कडून विकत घेतले होते.

याचाच अर्थ असा कि निकोलस डरवास यांनी ब्रिलंड कंपनीच्या शेअर्स मध्ये अडकवलेल्या ३००० डॉलर्सचे आता जवळपास ११,००० डॉलर्स झाले होते.

निकोलस डरवास यांची ब्रिलंड कंपनीतील गुंतवणूक फक्त महिन्याच्या काळात जवळ-जवळ ४ पट झाली होती.

निकोलस डरवास यांनी आपले शेअर विकले आणि ८००० डॉलर्सचा नफा कमवला.

निकोलस डरवास यांना पैशातून पैसा कमावण्याची हि पद्धत खूप आकर्षक वाटली आणि त्यांनी स्टॉक मार्केट मध्ये अधिकाधिक सक्रियपणे गुंतवणूक करण्याचे ठरवले.

निकोलस डरवास यांची शेअर बाजारातील सुरुवात आणि अपयश

निकोलस डरवास शेअर बाजारात अगदी नवीन होते म्हणून मग त्यांनी शेअर बाजारातील जाणकार लोकांचा सल्ला घ्यायचे ठरवले.

अशाप्रकारे अनेक लोकांशी सल्ला-मसलत करून त्यांनी ओल्ड स्मोकी गॅस अँड ऑइल, कायरंड माईन्स आणि रेक्सस्पार असे काही शेअर्स निवडले आणि हळूहळू या शेअर्समध्ये गुंतवणूक केली.

थोड्याच दिवसात निकोलस डरवास यांना आपला गुंतवणुकीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात आले.

निकोलस डरवास यांनी गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे शेअर्स काही वाढले नाही आणि निकोलस डरवास याना भरपूर नुकसान सोसावे लागले.

अशाप्रकारे निकोलस डरवास यांनी यशस्वी ट्रेडर होण्यापूर्वीची आपली अपयशाची पहिली पायरी चढली.

निकोलस डरवास यांच्या लक्षात आले कि कोणाला तरी वाटते म्हणून एखाद्य कंपनीत गुंतवणूक केल्याने आपल्याला फायदा मिळू शकत नाही.

निकोलस डरवास यांनी आता नवी योजना आखली.

त्यांनी फक्त तज्ञांच्या मतांवर अवलंबून रहाण्यापेक्षा उद्योग विश्वातील माहिती देणाऱ्या वृत्तपत्रांची तसेच मासिकांची मदत घेण्याचे ठरवले.

डरवास यांनी शेअर मार्केट खरेदी-विक्री याविषयी टिप्स देणाऱ्या वृत्तपत्रे आणि मासिके यांचे सदस्यत्व (मेम्बरशिप) घेतले आणि त्यानुसार पुन्हा गुंतवणूक सुरु केली.

निकोलस डरवास यांनी पुन्हा एकदा टप्या-टप्याने मिळालेल्या टिप्स प्रमाणे शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि त्यांची योजना या वेळी देखील अयशस्वी झाली.

डरवास याना पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले.

असे म्हणतात कि टिप्स या हॉटेलमध्ये असतात, शेअर बाजारात नाही.

मित्रांनो, तेव्हा मी आपल्याला आवर्जून सांगेल कि कोणालाही टिप्स देण्याच्या आणि कोणाकडून टिप्स घेण्याच्या भानगडीत मुळीच पडू नका. असो

पुढे निकोलस डरवास यांच्या असे लक्षात आले कि वॉल स्ट्रीट हे एक मोठे स्टॉक एक्सचेंज आहे आणि तिथे नेहमी मोठ्या घडामोडी होत असतात.

त्यामुळे निकोलस ट्रेडिंगसाठी अमेरिकेतील वॉलस्ट्रीट येथे आले.

निकोलस डरवास आले त्यावेळी वॉल स्ट्रीट भरभराटीला होता.

डरवास दररोज जवळपास २० ट्रेड करत त्याचा परिणाम असा होत असे कि त्यांना भरपूर ब्रोकरेज द्यावे लागे याउलट ट्रेडिंगमधून नफा मात्र नसल्यासारखाच मिळत असे

अनेकदा डरवास जितका नफा ट्रेडिंग करून मिळवत नसत त्याहून अधिक ब्रोकरेज त्यांचा ब्रोकर कमावत असे.

सरतेशेवटी निकोलस यांना असेच चालू राहिल्यास आपल्या हाती काहीही लागणार नसल्याची तीव्र जाणीव झाली.

निकोलस यांनी आता शेअर मार्केट संबधी माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि जवळपास शेअर मार्केट संबधी २०० पुस्तके आणि अनेक फायनान्शियल रिपोर्ट्स वाचून काढले.

निकोलस डरवास दिवसातील ८-८ तास वाचनात घालवत होते.

निकोलस यांनी पुन्हा मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले आणि संपूर्ण विचाराअंती त्यांनी जोन्स अँड लॉफलिन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले.

गुंतवणुकीसाठी स्टॉक तर भेटला पण डरवास यांच्याकडे आता गुंतवण्यासाठी पुरेसे भांडवल शिल्लक राहिले नव्हते.

डरवास यांनी लास वेगासमधील आपली मालमत्ता, ते काम करत असलेल्या लॅटिन क्वार्टरमधून आगाऊ रक्कम घेतली आणि आपल्या कार्यक्रमांमधून मिळालेले पैसे असे आपले सर्व भांडवल जोन्स अँड लॉफलिन कंपनीमध्ये गुंतवले.

मित्रांनो निकोलस डरवास यांची सर्व जमापुंजी त्यांनी जोन्स अँड लॉफलिन कंपनीमध्ये यावेळी गुंतवली होती.

पुढे व्हायचं तेच झालं आणि निकोलस डरवास यांना पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले.

काही केल्या अपयश निकोलस डरवास यांची पाठ सोडायला तयार नव्हते.

मार्केटमध्ये मिळालेल्या टिप पासून मदत होत नाही, तज्ञांची मते आजमावून पहिले पण त्याचा फायदा झाला नाही आणि स्वतः विश्लेषण देखील करून बघितले पण त्याचा देखील काही उपयोग झाला नाही.

मार्केटमध्ये पैसा कमवायचा तर कमवायचा तरी कसा.

निकोलस डरवास यांची यशस्वी ट्रेडर म्हणून वाटचाल

पण मित्रांनो, म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे कन रगडीता तेलही गळे.

निकोलस यांना एक कल्पना सुचली.

त्यांनी ठरवले कि आता आपण अशा स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची जो स्टॉक मागील काही दिवसांपासून सतत वाढतो आहे आणि ज्याच्यातील ट्रेडिंग व्हॉल्युम देखील वाढतो आहे.

अशा प्रकारे या अतिशय साध्या तंत्राचा वापर करून गुंतवणूक करण्याचे निकोलस यांनी ठरवले.

शेअर शोधत असताना त्यांना टेक्सास गल्फ नावाचा एक शेअर सापडला आणि निकोलस डरवास यांनी टेक्सास गल्फ मध्ये आपलं उरलं-सुरलं भांडवल गुंतवले.

अखेर तो क्षण आला निकोलस डरवास यांना थोड्याच दिवसात चांगला प्रॉफिट झाला.

निकोलस डरवास यांनी हा प्रॉफिट आपल्याला टेक्निकमुळे मिळाला कि नशिबामुळे हे तपासायचे ठरवले.

पुन्हा आपले तंत्र वापरून त्यांनी एम अँड एम वूड वर्किंग कंपनीत गुंतवणूक केली आणि त्यांना पुन्हा एकदा चांगला प्रॉफिट झाला.

निकोलस डरवास यांनी शोधलेले हे गुंतवणुकीचे तंत्र डरवास बॉक्स थेअरी म्हणून प्रसिद्ध आहे.

निकोलस डरवास आपल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने नेहमी फिरत असत आणि आणि फावल्या वेळात डरवास बॉक्स टेक्निकचा वापर करून अगदी काही तासांतच गुंतवणुकीसाठी स्टॉक शोधून काढत असत.

रोज फक्त काही तास मेहनत करून निकोलस डरवास यांनी शेअर बाजारातून लाखो रुपये कमावले.

शेअर बाजारातून जवळपास ५ लाख डॉलर्स कमावल्या नंतर निकोलस डरवास यांचा आत्मविश्वास वेगळ्याच उंचीवर होता.

त्यांना आपल्याला जणू शेअर मार्केटची गुरुकिल्ली सापडल्याचा विश्वास निर्माण झाला होता.

अजून पैसे कमवण्यासाठी आता त्यांनी पूर्णवेळ शेअर बाजारात काम करण्याचे ठरवले होते.

इ एल ब्रूस कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून,मिळालेल्या १,६०,००० डॉलर्सचा वापर त्यांनी डे-ट्रेडिंगसाठी करण्याचे ठरवले.

निकोलस डरवास यांनी स्वतःला पूर्णपणे डे-ट्रेडिंगमध्ये झोकून देत जोरदार डे-ट्रेडिंग सुरु केले.

त्यांनी रोम केबल्स, अमेरिकन मोटर्स, अमेरिकन केबल्स, शेरोन स्टील, रिचर्ड्स केमिकल्स इत्यादी विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये डे-ट्रेडिंग केले आणि यातून त्यांना पुन्हा एकदा १,००,००० डॉलर्सचे मोठे नुकसान झाले.

निकोलस यांनी स्वतःलाच प्रश्न केला माझ्यासारख्या व्यक्ती ज्याने बाजारातून लाखो रुपये कमावले, त्याला १,००,००० डॉलर्स इतके मोठे नुकसान कसे होऊ शकते?

तेव्हा त्यांना त्याचे जे उत्तर सापडले ते होते त्यांचे कान.

हो अगदी बरोबर त्यांचे कान, निकोलस त्यांच्या कानावर पडणाऱ्या प्रत्येक बातमीचा आणि घडामोडींचा विचार करत आणि त्याचा परिणाम थेट त्यांच्या ट्रेडिंगवर होत असे.

याउलट आधी ते कामानिमित्त सतत दौरे करत असत आणि उरलेल्या वेळेतच शेअरचा अभ्यास करत.

शेअर बाजारातील बातम्यांपासून निकोलस पूर्णपणे दूर असत.

निकोलस डरवास यांना आता कळून चुकले होते कि बाजारात चांगली संधी असेल तरच ट्रेडिंग करून फायदा होतो नाहीतर नुकसान ठरलेलेच आहे.

डे-ट्रेडिंग मध्ये झालेल्या तोट्यामुळे निकोलस पुन्हा डेलिव्हरी ट्रेडिंग कडे वळाले.

आजकालच्या भाषेत आपण यालाच स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग असे म्हणतो.

निकोलस डरवास म्हणतात कि ‘जेव्हा एखादा शेअर अपट्रेंडमध्ये असतो तेव्हा आपण तो शेअर खरेदी केला पाहिजे आणि आपण तो शेअर विकण्याची घाई करता काम नये जर शेअर अपट्रेंडमध्ये असेल तर आपल्याला नक्कीच चांगला नफा मिळवण्याची संधी असते याउलट जेव्हा शेअर डाउनट्रेंडमध्ये जाण्याचे संकेत देतो, तेव्हा आपण तो शेअर लवकरात लवकर विकला पाहिजे जेणेकरून आपले कमीत कमी नुकसान होईल. ’

आपण येणाऱ्या लेखात निकोलस डरवास यांनी शोधलेले डरवास बॉक्स टेक्निक सविस्तर पणे बघणार आहोत.

निकोलस डरवास यांची पुस्तके

निकोलस डरवास ट्रेडर म्हणून तर यशस्वी होतेच शिवाय ते लेखक म्हणून देखील प्रसिद्ध होते.

खाली निकोलस डरवास यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे

How I Made 2,000,000 in the Stock Market. Published in 1960 (hardcover). Available in French (softcover)[16]
“हाव आय मेड $२०,००,००० इन स्टॉक मार्केट (मी शेअर बाजारात २०,००,००० डॉलर्स कसे कमावले)” १९६० साली प्रकाशित

Wall Street: The Other Las Vegas. Published in 1964
वॉल स्ट्रीट: दुसरे लास वेगास, १९६४ साली प्रकाशित

The Anatomy of Success. Published in 1965
यशाचा गुरुमंत्र, १९६५ साली प्रकाशित

The Darvas System for Over-The-Counter Profits. Published in 1971 (hardcover).
नफ्याचे डरवाससूत्र, १९७१ साली प्रकाशित

You Can Still Make It in the Market. Published in 1977 (hardcover) Republished on August 20, 2008;
तुम्ही शेअर बाजारात यशस्वी होऊ शकतात, १९७७ साली प्रकाशित, २०ऑगस्ट २००८ साली पुनःप्रकाशित

निकोलस डरवास यांचे ट्रेडिंगविषयी विचार

“स्टॉक खरेदी करण्याचे माझे एकमेव कारण म्हणजे त्याच्या किमतीत सतत होणारी वाढ, असे होत असल्यास, इतर कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. जर तसे घडत नसेल तर इतर कोणतेही कारण विचारात घेण्यासारखे नाही.”

“मला हे माहित होते … की मी माझ्यासाठी ठरवलेल्या पद्धतीशी मला एकनिष्ठ राहावे लागेल.”

“गुंतवलेल्या रकमेच्या प्रमाणात झालेल्या तोट्यांपेक्षा मोठे नफा घेण्यात मी यशस्वी झालो.”

“मी विश्लेषणावर विश्वास ठेवतो आणि पूर्वानुमानावर नाही.”

“मी बाजारात (स्टॉक) महाग खरेदी करत आलो आणि जास्त महाग विकत आलो.”Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment