जेस्सी लिव्हरमोर मराठी | Jesse Livermore in Marathi

5/5 - (1 vote)

त्याकाळी जेस्सी लिव्हरमोर हे नाव शेअर मार्केटच्या जगात तेवढंच प्रसिद्ध होत जेवढं आज वॉरेन बफे यांचं जगभर आहे.

वॉरेन बफे यांची ओळख आपण या आधीच करून घेतली आहे. आपण तो लेख वाचला नसेल तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

प्रसिद्ध इन्व्हेस्टर वॉरन बफे

जेस्सी लिव्हरमोर, द वूल्फ ऑफ वॉलस्ट्रीट (वॉलस्ट्रीटचा बादशहा), द ग्रेट बेअर ऑफ वॉलस्ट्रीट (वॉलस्ट्रीटचा सर्वात मोठा मंदोडिया) अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे जेस्सी लिव्हरमोर म्हणजे आजपर्यंतचा सर्वात यशस्वी ट्रेडर होय.

एकेकाळी जेस्सी लिव्हरमोर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते पण जगाचा निरोप घेतांना मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता.

अशाप्रकारे जेस्सी लिव्हरमोर यांची कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आणि खूप इंटरेस्टिंग आहे.

या लेखात आपण जेस्सी लिव्हरमोर या जगविख्यात आणि आजवरच्या सर्वात यशस्वी ट्रेडरच ओळख करून घेणार आहोत.

जेसी लिव्हरमोर हे जेसी लॉरिस्टन लिव्हरमोर या नावाने देखील ओळखले जातात.

लिव्हरमोर एक अमेरिकन जगप्रसिद्ध स्टॉक ट्रेडर होते, लिव्हरमोर यांना इंट्राडे ट्रेडिंगचे प्रणेते मानले जाते.

ज्या काळात कुठल्याही स्टॉकची सखोल आणि अचूक माहिती मिळणे अशक्य होते त्या काळात स्टॉक च्या किमतींचा अभ्यास करून जेस्सी लिव्हरमोर यांनी पुष्कळ संपत्ती जमवली होती.

आजच्या काळात या पद्धतीला टेकनिकल ॲनालिसिस असे म्हणतात

चला तर मग सुरुवात करूया

जेस्सी लिव्हरमोर यांचा जन्म

लिव्हरमोरचा जन्म मॅसॅच्युसेट्सच्या श्रुसबरी येथे २६ जुलै १८७७ रोजी अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबात झाला होता.

जेस्सीच्या वडिलांचे नाव होते हिराम ब्रुक्स लिव्हरमोर तर आईचे नाव होते लॉरा एस्थर लिव्हरमोर.

जेस्सीचा जन्म एका अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता

हिराम आणि लॉरा याना तीन अपत्ये होती, २ मुले इलियट, जेस्सी आणि १ मुलगी जिचे नाव होते मॅबेल

जेस्सी तिन्ही भावंडांमध्ये सर्वात लहान होता.

जेस्सी लहान असतांनाच जेस्सीचे कुटुंब मॅसॅच्युसेट्समधीलच ॲक्टन येथे राहण्यास गेले

जेस्सीची बालपणीचे दिवस इथेच गेले. लहानग्या जेस्सीकडे त्याच्या वडिलांचे फारसे लक्ष नसे मात्र जेस्सी आई लॉराचा लाडका होता आणि तीने त्याची चांगली देखभाल केली.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book


जेस्सी लिव्हरमोर यांचं शिक्षण

जेस्सी एक उपजतच हुशार मुलगा होता, वयाच्या तिसऱ्या वर्षीच लिहायला-वाचायला शिकला होता आणि वयाच्या केवळ पाचव्या वर्षी त्याने अर्थक्षेत्रातील बातम्या वाचायला सुरवात केली होती.

जेस्सीच्या प्रतिभेचा प्रत्यय त्याच्या शालेय जीवनातच आला होता. जेस्सीला गणितात आणि आकडेमोडीत चांगलीच गती होती

आपला गणिताचा वर्षाचा शालेय अभ्यासक्रम त्याने फक्त च वर्षात पूर्ण केला होता.


जेस्सी लिव्हरमोर यांचं सुरवातीचे जीवन

मात्र वयाच्या १४ व्या वर्षीच जेस्सीची शाळा सुटली, जेस्सीच्या वडिलांनी त्याला शाळेतून काढून घेतले आणि शेतात कामाला लावले.

पण जेस्सीची स्वप्न मोठी होती आणि त्याच्या आईचा त्याच्यावर विश्वास होता.

शाळा सुटल्यामुळे जेस्सी आणि त्याची आई दोघेही व्यथित झाले.

एकदिवस लॉराने जेस्सीला आपल्याजवळील ५ डॉलर्स दिले आणि गाडीत बसवून दिले.

जेसीने ड्रायव्हरला बोस्टनमधील स्टॉक ब्रोकर पेन वेबर येथे सोडण्याची विनंती केले. बोस्टन येथे त्याने बोर्डबॉयची नोकरी मिळवली.

पूर्वीच्या काळी स्टॉकच्या किमती टिकरटेपवर प्रिंट होऊन येत असत आणि प्रिंट होऊन येणाऱ्या किमती फलकांवर लिहिणे हे बोर्डबॉयच काम असे

जेस्सीला आपल्या कामातून आठवड्याला ५ डॉलर्स कमाई होत असे.

मुळातच आकड्यांची आणि अंकगणिताची आवड असल्याने जेस्सी आपल्या कामात रमून जाई.

जेस्सीने आपल्या डायरीत रोज शेअरच्या चढत्या-उतरत्या किंमतींच्या नोंदी करायला सुरुवात केली.

बाजारातील शेअरच्या किंमती एका ठराविक प्रकारे कमी-जास्त होतात असे जेस्सीच्या लक्षात आले.

शेअरच्या किमतीतील हालचालींचा पॅटर्न ओळ्खण्यास प्रखर बुद्धिमत्ता असणाऱ्या जेस्सीला वेळ लागला नाही

जेस्सी लिव्हरमोर यांचं सुरवातीचे व्यावसायिक जीवन

१८९२ मध्ये, वयाच्या १५ व्या वर्षी, त्याने शिकागो, बर्लिंग्टन आणि क्विन्सी रेलरोडवर बकेट शॉप मध्ये ५ डॉलर्सचा सट्टा लावला आणि आपल्या पहिल्याच सट्यावर ३.१२ डॉलर्स मिळवले.

बकेट शॉपमध्ये प्रत्यक्षात स्टॉक खरेदी न करता फक्त शेअरच्या किमतीतील होणाऱ्या हालचालींवरून खरेदी-विक्रीच्या पैजा लावल्या जातात.

बकेट शॉप हा एक बेकायदेशीर उद्योग होय. भारतात असाच काहीसा प्रकार डब्बा ट्रेडिंग म्हणून ओळखला जातो.

१८९३ ते १८९४ च्या काळात, वय जेस्सी दर आठवड्याला बोस्टनमधील बकेट शॉप मध्ये ट्रेडिंग करून सुमारे २०० डॉलर्स कमावत होता

१६ वर्षांचा होईपर्यंत जेस्सीची बकेटशॉप मधील कमाई त्याच्या बोर्डबॉय म्हणून होणाऱ्या कमाईपेक्षा बरीच जास्त होऊ लागली म्हणून मग जेस्सीने पूर्णवेळ बकेट शॉप मध्येच ट्रेडिंग सुरु केलं.

१८९७ च्या अखेरीस जेस्सीला बोस्टन शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील बकेटशॉपने बंदी घातली होती कारण होते जेस्सीचा शेअरच्या किमतीतील हालचालींचा अचूक अंदाज आणि तो कमावत असलेला बख्खळ पैसा.

अनेकदा जेस्सीला आपले नाव बदलून किंवा वेषांतर करून बकेटशॉप मध्ये जावे लागत असे पण त्याची हि शक्कल खूप दिवस चालली नाही आणि त्याला पैसे मिळवणे मुश्किल झाले

जेस्सी लिव्हरमोर यांचा जगप्रसिद्ध ट्रेडर म्हणून प्रवास

१८९९ पर्यंत, जेस्सी लिव्हरमोर याने १०,००० डॉलर्स कमावले होते आणि १०,००० डॉलर्ससह तो न्यूयॉर्क शहरात गेला.

आता त्याने वॉल स्ट्रीटवर ट्रेडिंग सुरू केल. पण लवकरच, त्याने संपूर्ण रक्कम गमावली कारण टिकरटेप तीस ते चाळीस मिनिटांनी मागे पडत होती, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे अशक्य होत होते.

वॉल स्ट्रीटमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्यानंतर, जेसीने ५०० डॉलर्स एड हटन या आपल्या मित्राकडून उधार घेतले आणि तो सेंट लुईसला गेला.

जेस्सीने सेंट लुईस मध्ये पुन्हा एकदा बकेट शॉपमध्ये ट्रेडिंग चालू केले.

सेंट लुईस मधील लोकांना जेसी लिव्हरमोरकडे असलेल्या यशस्वी बकेट शॉप ट्रेडिंग कौशल्याचे ज्ञान नव्हते.

काही दिवसांतच जेस्सीने सेंट लुईस मध्ये २५०० डॉलर्स कमावले आणि तो न्यूयॉर्कला परतला.

जेस्सीने आपले उधार ५०० डॉलर्स चुकवले आणि उरलेल्या २००० डॉलर्स मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि बकेट शॉप मध्ये ट्रेडिंग सुरु केले.

लवकरच जेस्सीने आपल्या २००० डॉलर्स चे १०,००० डॉलर्स केले आणि तो वॉल स्ट्रीट वर परतला

१७ एप्रिल १९०६ रोजी जेस्सी लिव्हरमोरने युनियन पॅसिफिक रेलरोडच्या स्टॉक मध्ये मोठी शॉर्ट पोझिशन घेतली

दुसऱ्या दिवशी, सॅन फ्रान्सिस्कोला भयंकर भूकंप झाला आणि जेस्सीला २,५०,००० डॉलर्सचा नफा झाला.

ऑक्टोबर १९०७ मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज ५०% घसरला होता त्यावेळी जेस्सी लिव्हरमोर यांची शॉर्ट पोझिशन होती आणि जेस्सी लिव्हरमोर याना एकाच दिवसात १,०००,००० डॉलर्सचा प्रॉफिट झाला होता.

पुढे बाजाराची अजून घसरण होऊ नये म्हणून जेस्सी लिव्हरमोर यांनी जे पी मॉर्गन यांच्या विनंतीवरून बाजारात अजून शॉर्ट पोझिशन घेतली नाही.

याउलट जेस्सी लिव्हरमोर यांनी आता बाजारात खरेदी करायला सुरुवात केली आणि इतर ट्रेडर्सला देखील खरेदीसाठी प्रवृत्त केले.

हळूहळू शेअर बाजार सावरायला सुरुवात झाली.

जेस्सी लिव्हर मोर यांची संपत्ती आता ३ दशलक्ष डॉलर्स पर्यंत वाढली होती आणि जेस्सी लिव्हरमोर आता ट्रेडर्ससाठी हिरो झाले होते.

जेस्सी लिव्हर मोर यांची आता भरभराट झाली होती त्यांनी आपल्यासाठी एक अपार्टमेंट, एक रेल्वे कार आणि २,००,००० डॉलर्स किमतीचे एक जहाज देखील खरेदी केली.

या दरम्यान, त्यांची ट्रेडिंगमधील यशस्वी वाटचाल सुरूच होती लवकरच, त्याच्या नावावर ५ दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती जमा झाली होती.

१८०८ मध्ये, टेडी प्राइस नावाच्या कमोडिटी ट्रेडरच्या सल्ल्यानुसार, लिव्हरमोर यांनी कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली.

पण त्यांना हे समजलेच नाही की प्रत्यक्षात टेडी प्राइस हाच त्याचे शेअर्स विकत आहे.

परिणामी, लिव्हरमोर यांनी जवळजवळ ९०% संपत्ती गमावली.

१९०८ नंतर सुद्धा लिव्हरमोर यांची बाजारातील घसरण सुरूच होती आणि त्यांच्या डोक्यावर १ दशलक्ष डॉलर्सचा कर्जाचा डोंगर तयार झाला होता. लिव्हरमोर यांची ट्रेडिंग बंद झाली होती

जेस्सी लिव्हरमोर याना काही काळानंतर केवळ ५०० शेअर्स सोबत ट्रेडिंग करायची परवानगी मिळाली.

मिळालेल्या संधीच लिव्हरमोर यांनी सोनं केलं आणि १९१८ मध्ये वॉल स्ट्रीट च्या शेअर बाजारात पुनरागमन केले.

१९१८ मध्ये त्यांनी कापसाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चालू केली कि शेअर बाजार अडचणीत येऊ लागला.

पुढे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी लिव्हरमोर याना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले आणि शेअर बाजाराला अडचणीत न आणण्याविषयी विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून त्यांनी कापसाची आपली खरेदी थांबवली.

१९२९ मधील वॉल स्ट्रीट क्रॅश मध्ये त्यांनी एकाच दिवसात जवळजवळ १०० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.

१९३० च्या सुरुवातीला, काही वैयक्तिक समस्यांमुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आणि त्याचा परिणाम थेट त्यांच्या ट्रेडिंगवर होऊ लागला.

१९३४ मध्ये लिव्हरमोर दुसऱ्यांदा दिवाळखोर जाहीर झाले आणि शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडमधील त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

असे असले तरी त्यांना विश्वास होता की ते पुनरागमन करू शकतील परंतु तसे कधीच झाले नाही.

१९३९ च्या उत्तरार्धात जेस्सी लिव्हरमोर यांनी आपल्या मुलाच्या जेस्सी ज्युनियरच्या सांगण्यावरून हाऊ टू ट्रेड इन स्टॉक्स हे पुस्तक लिहिले मात्र त्याकाळी दुसरे महायुद्ध सुरू असल्याने पुस्तक चांगले विकले गेले नाही.

लिव्हरमोर यांच्या गुंतवणुकीच्या पद्धती विवादास्पद होत्या आणि प्रकाशनानंतर पुस्तकाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जेस्सी लिव्हरमोर यांचं वैयक्तिक जीवन

ऑक्टोबर १९०० मध्ये, वयाच्या २३ व्या वर्षी, जेसी लिव्हरमोर यांनी इंडियानापोलिसच्या नेटी जॉर्डन हिच्याशी लग्न केले. तथापि, ते थोड्याच वेळात वेगळे झाले आणि शेवटी १९१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

२ डिसेंबर १९१८ रोजी लिव्हरमोर यांनी २२ वर्षीय डोरोथी फॉक्स वेंडट या झीगफेल्ड फॉलीजमधील माजी झीगफेल्ड मुलीशी लग्न केले
त्यांना दोन मुले झाली जेसी लिव्हरमोर ज्युनियर आणि पॉल लिव्हरमोर.


१९३१ मध्ये, डोरोथी लिव्हरमोरने घटस्फोटासाठी अर्ज केला, जो १६ सप्टेंबर १९३२ रोजी मंजूर झाला. अशाप्रकारे जेस्सी लिव्हरमोर आणि डोरोथी फॉक्स वेंडट विभक्त झाले.

२८ मार्च १९३३ रोजी जेस्सी लिव्हरमोर यांनी तिसऱ्यांदा ३८ वर्षीय गायक आणि सोशलाइट हॅरिएट मेट्झ नोबलशी लग्न केले. हे दोघे शेवटपर्यंत सोबत होते

२ नोव्हेंबर १९४० रोजी जेस्सी लिव्हरमोर यांनी मॅनहॅटनमधील शेरी-नेदरलँड हॉटेलच्या क्लोकरूममध्ये ऑटोमॅटिक कोल्ट पिस्तूलाने स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

आत्महत्या केली तेव्हा जेस्सी लिव्हरमोर त्रेसष्ठ वर्षांचे होते.

अशाप्रकारे एका महान ट्रेडरचा दुर्दैवी अंत झाला


जेस्सी लिव्हरमोर यांचे ट्रेडिंगविषयी विचार

“तुमच्या तोट्यातील ट्रेड्समधून न डगमगता लवकरात लवकर बाहेर पडा”

“इतिहास पुन्हा पुन्हा घडतो, आणि घडतच राहील”

“(यशस्वी ट्रेडर होण्यासाठी )तुम्हाला जे काही हवे आहे ते अगदी तुमच्या समोरच आहे (स्क्रीनवरील चार्ट).”

“(शेअर बाजारात) संयमाने पैसा कमावता येतो, ट्रेडिंग करून नाही”

“(शेअर बाजारात) खरेदी करण्याची एक (योग्य) वेळ असते, विक्री करण्याची देखील एक (योग्य) वेळ असते आणि काहीही न करण्याची देखील एक वेळ असते”

“शेअर बाजारात काहीही नवीन नाही, काही नवीन होऊ देखील शकत नाही कारण लोकांची मानसिकता खूप खूप जुनी आहे”

“मार्केट कधीही चुकीचे नसते, मार्केटविषयीची मते मात्र अनेकदा चुकीची असतात”

“वाढणारे स्टॉक खरेदी करा आणि पडणारे स्टॉक विक्री करा”

मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला जरूर कळवा

आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा लेख वाचला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत

धन्यवाद !!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5


चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment