कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi

4.7/5 - (3 votes)

मित्रांनो, या अगोदरच्या लेखात आपण कॅन्डलस्टिकची ओळख करून घेतली तसेच कॅन्डलस्टिकच्या वीक, टेल आणि बॉडी अशा विविध घटकांची माहिती करून घेतली.

या लेखात आपण लॉन्ग कॅण्डल विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

चार्टवर लॉन्ग कॅण्डल कशा तयार होतात, चार्टवर लॉन्ग कॅण्डल कशा मार्क कराव्या आणि लॉन्ग कॅन्डलचा वापर ट्रेडिंगसाठी कसा करावा अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत.

चार्टवरील लॉन्ग कॅण्डलला अतिशय जास्त महत्व असून हा लेख वाचल्यानंतर तुमचा चार्टवरील लॉन्ग कॅण्डलकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून जाईल याची मला खात्री आहे.

चला तर मग सुरुवात करूया.

लॉन्ग कॅण्डल | Long Candle

सर्वसाधारणपणे ज्या कॅण्डलची बॉडी हि वीक आणि टेलच्या तुलनेने बऱ्यापैकी मोठी असते अशा कॅण्डलला आपण लॉन्ग कॅण्डल म्हणू शकतो.

कॅण्डलची मोठी बॉडी आणि लहान शॅडो शेअरमध्ये एकाच दिशेने होणारी हालचाल दाखवतात.

चार्टवर तयार होणाऱ्या लॉन्ग कॅण्डल स्टॉक मधील व्होलॅटिलिटी आणि ट्रेंड दर्शवितात.

यामुळेच इंट्राडे ट्रेडर्स आणि स्विंग ट्रेडर्स ज्या स्टॉकमध्ये अशा मोठ्या कॅण्डल तयार होत असतील त्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणे अधिक पसंत करतात.

खालील चित्रात मी लॉन्ग कॅण्डल दाखवल्या आहेत.

लॉन्ग कॅण्डल  Long Candle
लॉन्ग कॅण्डल आणि शॉर्ट कॅण्डल

लॉन्ग कॅण्डल अपट्रेन्डमध्ये तसेच डाउनट्रेण्डमध्ये देखील आढळतात.

लॉन्ग कॅण्डल आणि मोठे व्हॉल्युम बार म्हणजे ट्रेडर्सचा स्टॉक मध्ये असणाऱ्या भरपूर इन्टरेस्टच प्रतीक होय.

मोठी बॉडी असणाऱ्या कॅण्डल बुल्स आणि बेअर्स यांची सध्याची मार्केट मधील स्थिती आणि ताकद दाखवतात.

अनेक ट्रेडर्स चार्टवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक कॅन्डलपासून तयार होणाऱ्या पॅटर्नला जास्त महत्व देतात आणि ट्रेडिंगसाठी वापर करतात.

माझ्या मते चार्टवर तयार होणारी प्रत्येक लॉन्ग कॅण्डल हि देखील एखाद्या कॅन्डलस्टिक पॅटर्न इतकीच महत्वाची असते.

इतकच नाही तर लॉन्ग कॅण्डल हिरव्या रंगाची आहे कि लाल रंगाची आहे यावरून अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि निरनिराळे आडाखे बांधता येतात.

मित्रांनो लॉन्ग कॅण्डल बुल्स आणि बेअर्सचे मार्केट मधील वर्चस्व दाखवतात तर शॉर्ट कॅण्डल बुल्स आणि बेअर्स यांच्यातील रस्सीखेच आणि अनिश्चितता दाखवतात.

शॉर्ट कॅण्डलला स्पिनिंग टॉप असे देखील म्हणतात.

या लेखात आपण लॉन्ग कॅण्डल वरच चर्चा करणार असून स्पिनिंग टॉप कॅण्डल आपण नवीन लेखात अभ्यासणार आहोत.

मार्केट बुलिश असताना मोठ्या हिरव्या कॅण्डल बघायला मिळतात याउलट मार्केट बेअरिश असेल तर मोठ्या लाल कॅण्डल चार्टवर तयार होतात.

आता लॉन्ग कॅण्डल म्हणजे नेमकं काय बरं ? कशा मार्क करतात या लॉन्ग कॅण्डल ? लॉन्ग कॅण्डलचा ट्रेडिंगसाठी वापर तरी कसा करतात ?

चला समजून घेउया

मित्रांनो, सुरुवात आपण हिरव्या लॉन्ग कॅण्डल पासून करणार आहोत.

ज्याप्रमाणे अपट्रेन्डमध्ये तयार होणाऱ्या हिरव्या लॉन्ग कॅण्डल मजबूत अपट्रेण्ड दाखवतात त्याचप्रमाणे डाउनट्रेन्डमध्ये तयार होणाऱ्या हिरव्या लॉन्ग कॅण्डल ट्रेण्ड रिव्हर्सलचा संकेत देतात.

लॉन्ग कॅण्डल ओळखण्यासाठी काही महत्वपूर्ण मुद्दे मी खाली नमूद करू इच्छितो :

१. चार्टवरील लॉन्ग कॅण्डल आपल्याला बघताक्षणी डोळ्यात भरणारी असावी.
२. चार्टवरील हिरव्या लॉन्ग कॅण्डलची क्लोझिंग हि जास्तीत जास्त उंचावर किंवा हायकडे असावी.
३. हिरव्या लॉन्ग कॅण्डलचा व्हॉल्युम ॲव्हरेज व्हॉल्युमपेक्षा जास्त असल्यास लॉन्ग कॅण्डल अजून जास्त परिणामकारक ठरतात.
४. चार्टवरील हिरव्या कॅण्डलची रियल बॉडी अगोदरच्या चार-पाच कॅन्डलच्या रियल बॉडीपेक्षा पुरेशी मोठी असावी.
५. चार्टवरील हिरव्या कॅण्डलची रियल बॉडी अगोदरच्या कॅन्डलच्या रियल बॉडीपेक्षा अडीच ते तीनपट अधिक असावी असेही अनेक ट्रेडर समजतात.

खालील चार्टवर मी सर्वसाधारणपणे शोधता येतील अशा हिरव्या लॉन्ग कॅण्डल दाखविल्या आहेत.

लॉन्ग कॅण्डल | Long Candle

चार्ट बघताच तुमच्या असं लक्षात येईल कि या सर्व हिरव्या लॉन्ग कॅण्डल बघताक्षणी नजरेत भरतात.

याशिवाय आपण चार्टवर हेदेखील बघू शकतो कि अपट्रेन्डमध्ये मोठ्या हिरव्या कॅण्डल बघायला मिळतात तर लहान लाल कॅण्डल बघायला मिळतात.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि व्हॉल्युम

अपट्रेन्डमध्ये हिरव्या कॅण्डलचा व्हॉल्युम देखील जास्त बघायला मिळतो तर तर लाल कॅण्डलचा व्हॉल्युम तुलनेने कमी बघायला मिळतो.

लॉन्ग कॅन्डलचा व्हॉल्युम देखील सरासरीपेक्षा जास्त असल्यास किंवा मागील काही दिवसांपेक्षा तुलनेने जास्त असल्यास अशी लॉन्ग कॅण्डल अधिक परिणामकारक असल्याचे मी आपल्याला याआधीच सांगितले आहे.

मित्रांनो, जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर ज्या स्टॉकच्या चार्टवर अशा लॉन्ग कॅण्डल तयार होत असतील आणि व्हॉल्युम मध्ये सुद्धा मोठी हालचाल दिसत असेल तर असे स्टॉक नक्की तुमच्या वॉचलिस्ट मध्ये असू द्या.

खालील चार्टवर मी लॉन्ग कॅण्डल आणि व्हॉल्युम देखील दाखवला आहे.

लॉन्ग कॅण्डल | Long Candle

आपण बघू शकता कि अपट्रेन्डमध्ये बॉडीप्रमाणेच हिरव्या कॅन्डलचा व्हॉल्युम देखील तुलनेने लाल कॅण्डल पेक्षा जास्त आहे.

आता आपण या कॅन्डलचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत.

हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि सपोर्ट-रेझिस्टन्स

मित्रांनो, लॉन्ग कॅन्डलच्या मदतीने आपण चार्टवर महत्वाच्या लेव्हल मार्क करू शकतो किंवा सपोर्ट-रेझिस्टन्स मार्क करू शकतो.

सपोर्ट-रेझिस्टन्स विषयी मी यापूर्वीच माहिती दिली असून त्या लेखाची लिंक खाली देत आहे.

सपोर्ट आणि रेझिस्टन्स

खाली टाटा स्टीलचा डेली चार्ट दिला असून मी चार्टवर लॉन्ग कॅण्डल मार्क केलेल्या आहेत.

हिरव्या लॉन्ग कॅण्डल | Green Long Candle

चार्टवर मी पोपटी रंगाने काही लेव्हल मार्क केल्या आहेत.

तुम्ही या लेव्हलचं बारकाईने निरीक्षण केल्यास तुमच्या असं लक्षात येईल कि स्टॉक या मार्क केलेल्या लेव्हल जवळ आल्यानंतर या लेव्हल सपोर्ट आणि रेझिस्टन्स प्रमाणे काम करत आहेत.

या लेव्हल मार्क करण्यासाठी मी खालील पद्धत वापरली आहे.
१. चार्टवर अगोदर सांगितल्याप्रमाणे लॉन्ग कॅण्डल मार्क करणे.
२. लॉन्ग कॅन्डलच्या हाय प्राइस आणि लो प्राइस यांच्या लेव्हल मार्क करणे
३. तुमचे सपोर्ट आणि रेझिस्टन्स तयार आहेत

आहे कि नाही एकदम सोप्प ? ? ?

हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि सपोर्ट झोन

आता मी तुम्हाला लॉन्ग कॅन्डलचं आणखी एक सिक्रेट सांगणार आहे.

जसे कि आपल्याला माहितीच आहे कि स्टॉक सपोर्ट झोन किंवा डिमांड झोन जवळ आल्यावर स्टॉकची किंमत वाढायला सुरुवात होते.

खाली इंडियाबुल हाउसिंग फायनान्सचा डेली चार्ट आहे.

मित्रांनो, आपल्याला हिरव्या लॉन्ग कॅन्डलचा लो आणि मध्य (सेंटर) सुद्धा मार्क करायचा आहे.

चार्टवर मी हिरवी लॉन्ग कॅन्डल मार्क केली आहे, आपण बघू शकतो कि स्टॉक मध्ये जेव्हा रीट्रेसमेन्ट झाली आहे तेव्हा ती अगदी हिरव्या लॉन्ग कॅन्डलच्या मध्यापर्यंतच झाली आहे.

हिरव्या लॉन्ग कॅण्डल | Green Long Candle

मला इथे हे अधोरेखित करायचे आहे कि हिरव्या लॉन्ग कॅन्डलचा जो खालचा निम्मा भाग आहे तो एक सपोर्ट झोन किंवा डिमांड झोन म्हणून काम करतो.

हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि ट्रेण्ड रिव्हर्सल

मित्रानो, अपट्रेन्ड असतांना हिरव्या लॉन्ग कॅन्डल तयार होतात आणि त्या ट्रेण्ड कॉन्टीनुएशन दाखवतात हे आपण याआधीच पाहिले आहे. याउलट जर स्टॉकमध्ये डाउनट्रेन्ड असेल आणि चार्टवर एखादी चांगली हिरवी लॉन्ग कॅण्डल तयार झाली तर सावधान !!! स्टॉक मधील ट्रेण्ड रिव्हर्स होण्याची शक्यता आहे.

डाउनट्रेन्ड नंतर तयार होणारी हिरवी लॉन्ग कॅन्डल स्टॉकमधल्या नवीन उपट्रेन्डची सुरुवात असू शकते.

खाली आपल्यासोबत हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा डेली चार्ट आहे.

आपण बघू शकतो कि हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा स्टॉक अनेक दिवसांपासून डाउनट्रेंन्डमध्ये आहे आणि स्टॉकमध्ये एक भली मोठी हिरवी कॅण्डल तयार झाली.

हिरवी कॅण्डल तयार होताच स्टॉकमधील डाउनट्रेंन्ड बदलून स्टॉकमध्ये अपट्रेन्ड चालू झाला आणि पुढचे बरेच दिवस स्टॉकची किंमत वाढतच राहिली.

हिरव्या लॉन्ग कॅण्डल | Green Long Candle

आपल्याला अशा लॉन्ग कॅण्डल मार्क करायच्या आहेत आणि सपोर्ट-रेझिस्टन्स मार्क करायच्या आहेत.

सपोर्टजवळ बुलिश सिग्नल मिळताच किंवा रेझिस्टन्स ब्रेक झाल्यास आपण बायिंग करायची आहे आणि रेझिस्टन्सजवळ बेअरिश सिग्नल मिळताच किंवा सपोर्ट ब्रेक झाल्यास आपण सेलिंग करायची आहे.

हिरवी लॉन्ग कॅण्डल आणि ब्रेकआऊट

मित्रांनो, ब्रेकआऊट ट्रेडिंग हि एक अतिशय लोकप्रिय ट्रेडिंग पद्धत आहे.

ब्रेकआऊट म्हणजे स्टॉकची किंमत आपल्या रेझिस्टन्स लेव्हलच्या पलीकडे जाऊन क्लोझ होणे.

ब्रेकआऊट हि एका नवीन अपट्रेन्डची सुरुवात असू शकते.

मी इथे सांगू इच्छितो कि रेझिस्टन्स जर एका हिरव्या लॉन्ग कॅण्डलमुळे ब्रेक झाला असेल तर आपण ब्रेकआऊट नंतर बायिंग करू शकतो.

आता आपण चार्टवर ब्रेकआऊट बघूया.

आपल्यासोबत खाली टाटा स्टीलचा डेली चार्ट आहे.

लॉन्ग कॅण्डल | Green Long Candle

आपण बघू शकतो कि टाटा स्टील मध्ये ११८६ जवळ एक रेझिस्टन्स लेव्हल आहे आणि स्टॉकची किंमत तीन वेळा रेझिस्टन्स लेव्हल पासून खाली घसरली आहे.

नंतर आपण बघू शकतो एका हिरव्या लॉन्ग कॅण्डलने हा रेझिस्टन्स ब्रेक केला आहे तर दुसऱ्या एका हिरव्या लॉन्ग कॅन्डलने हा सपोर्ट कन्फर्म केला आहे.

अशाप्रकारे आपला हिरव्या लॉन्ग कॅन्डलचा भाग इथे संपला.

मित्रांनो, आता आपण लाल लॉन्ग कॅन्डलचा अभ्यास करणार आहोत.

हिरव्या लॉन्ग कॅन्डल तेजी दाखवतात तर लाल लॉन्ग कॅन्डल मंदी दाखवतात हे आपल्याला माहितच आहे.

आपण आज कॅन्डलचे अजून दोन रंग बघणार आहोत ते आहेत लोभ आणि भीती.

इंग्रजीत यालाच अनुक्रमे ग्रीड आणि फियर म्हणतात.

हिरवी लॉन्ग कॅण्डल असते ती लोभी खरेदीदारांची म्हणजेच शेअरची किंमत अजून वाढेल अशी अपेक्षा असणाऱ्यांची तर लाल लॉन्ग कॅण्डल असते ती घाबरलेल्या विक्रेत्यांची म्हणजेच शेअरची किंमत आता कोसळेल अशी भीती असणाऱ्यांची.

लोभापेक्षा भीती जास्त परिणामकारक असल्याने लाल लॉन्ग कॅन्डल अजून जास्त प्रभावी असतात.

चला तर मग सुरुवात करूया

लाल लॉन्ग कॅण्डल

मित्रांनो, जे नियम आपण हिरव्या लॉन्ग कॅन्डल मार्क करण्यासाठी वापरतो तेच नियम लाल लॉन्ग कॅन्डल मार्क करण्यासाठी वापरायचे आहेत.

आपल्या सोयीसाठी मी सर्व नियम पुन्हा एकदा खाली देत आहे.

१. चार्टवरील लॉन्ग कॅण्डल आपल्याला बघताक्षणी डोळ्यात भरणारी असावी.
२. चार्टवरील लाल लॉन्ग कॅण्डलची क्लोझिंग हि ओपनिंग पासून खाली किंवा कॅन्डलच्या लोवकडे असावी.
३. लाल लॉन्ग कॅण्डलचा व्हॉल्युम ॲव्हरेज व्हॉल्युमपेक्षा जास्त असल्यास लॉन्ग कॅण्डल अजून जास्त परिणामकारक ठरतात.
४. चार्टवरील लाल कॅण्डलची रियल बॉडी अगोदरच्या चार-पाच कॅन्डलच्या रियल बॉडीपेक्षा पुरेशी मोठी असावी.
५. चार्टवरील लाल कॅण्डलची रियल बॉडी अगोदरच्या कॅन्डलच्या रियल बॉडीपेक्षा अडीच ते तीनपट अधिक असावी असेही अनेक ट्रेडर समजतात.

खाली टाटा मोटर्सचा डेली चार्ट दिलेला आहे आणि चार्टवर मी लाल लॉन्ग कॅण्डल मार्क केल्या आहेत.

आपण हे बघू शकतो डाउनट्रेंन्डमध्ये अनेक लाल लॉन्ग कॅण्डल तयार होतात.

लाल लॉन्ग कॅण्डल | Red Long Candle

लाल लॉन्ग कॅण्डल आणि व्हॉल्युम

आपण हे बघू शकतो डाउनट्रेंन्डमध्ये अनेक लाल लॉन्ग कॅण्डल तयार होतात याशिवाय लाल लॉन्ग कॅण्डलचा व्हॉल्युम देखील हिरव्या कॅन्डलपेक्षा जास्त असल्याचे आपल्या निदर्शनास येईल.

मित्रांनो, चार्टवर बघताक्षणी आपल्याला अनेक लॉन्ग कॅण्डल दिसू शकतात मात्र व्हॉल्युमचा वापर केल्यास आपण चार्टवरील महत्वाच्या असणाऱ्या लॉन्ग कॅण्डल एकदम सोप्या पद्धतीने मार्क करू शकतो.

व्हॉल्युमची ओळख आपण याआधीच करून घेतली आहे, सोयीसाठी मी व्हॉल्युम वरील लेखाची लिंक खाली देत आहे.

 व्हॉल्युम आणि व्हॉल्युम ॲनालिसिस

आपल्याला ज्या लाल लॉन्ग कॅन्डलचा व्हॉल्युम सरासरीपेक्षा जास्त असल्यास आपण अशा कॅण्डल मार्क करायच्या आहेत.

लाल लॉन्ग कॅण्डल | Red Long Candle

आता आपण बघूया या कॅन्डलचा वापर आपण कसा करू शकतो.

लाल लॉन्ग कॅण्डल आणि सपोर्ट-रेझिस्टन्स लेव्हल

मित्रांनो, लाल लॉन्ग कॅन्डल बेअर्सची ताकद दाखवतात.

आपल्याला लाल लॉन्ग कॅन्डलची हाय प्राइस आणि लोव प्राइस अशा दोन्ही लेव्हल मार्क करायच्या आहेत.

मी चार्टवर लाल रंगाने अशा लेव्हल मार्क केल्या आहेत.

आपण चार्टवर बघू शकतात कि चार्टवरील या लेव्हल सपोर्ट-रेझिस्टन्स म्हणून काम करतात.

लाल लॉन्ग कॅण्डल | Red Long Candle

लाल लॉन्ग कॅण्डल आणि रेझिस्टन्स झोन

याशिवाय आपल्याला लॉन्ग कॅन्डलच्या मध्यावर देखील लेव्हल मार्क करायची आहे आणि या लेव्हलचा वापर आपण रेझिस्टन्स प्रमाणे करायचा आहे.

खाली मी चार्टवर मी लॉन्ग कॅन्डलच्या मध्यावर रेझिस्टन्स लेव्हल मार्क केली आहे आणि आपण बघू शकतो कि स्टॉकची किंमत बरोबर या रेझिस्टन्स लेव्हल जवळ जाताच पुन्हा कोसळायला सुरुवात होते आहे.

लाल लॉन्ग कॅण्डल | Red Long Candle

चार्टवर दाखवल्याप्रमाणे लाल लॉन्ग कॅन्डलचा उपयोग आपण रेझिस्टन्स झोन किंवा सप्लाय झोन म्हणून करू शकतो.

लाल लॉन्ग कॅण्डल आणि ट्रेण्ड रिव्हर्सल

मित्रांनो, याशिवाय लाल लॉन्ग कॅण्डल या अपट्रेन्ड मध्ये तयार झाल्यास तो एक ट्रेण्ड रिव्हर्सल सिग्नल असू शकतो.

आपण खाली दिलेल्या एशियन पेंटच्या डेली चार्टवर बघू शकतो कि स्टॉक मध्ये एका मोठ्या अपट्रेन्ड नंतर एक मोठी लाल कॅण्डल तयार झाली आहे.

लाल कॅण्डलचा व्हॉल्युम देखील सरासरी व्हॉल्युमपेक्षा पुष्कळ जास्त आहे.

लाल लॉन्ग कॅण्डल | Red Long Candle

आपण बघू शकतो कि लाल लॉन्ग कॅण्डल तयार झाल्यानंतर स्टॉक मधील अपट्रेन्ड संपला असून स्टॉकमध्ये पुढचे बरेच दिवस डाउनट्रेन्ड राहिला आहे.

लाल लॉन्ग कॅण्डल आणि ब्रेकडाउन

मित्रांनो, ब्रेकडाउन ट्रेडिंग हि एक अतिशय लोकप्रिय ट्रेडिंग पद्धत आहे.

ब्रेकडाउन म्हणजे स्टॉकची किंमत आपल्या सपोर्ट लेव्हलच्या खाली क्लोझ होणे.

ब्रेकडाउन हि एका नवीन डाउनट्रेन्डची सुरुवात असू शकते.

मी इथे सांगू इच्छितो कि सपोर्ट लेव्हल जर एका लाल लॉन्ग कॅण्डलमुळे ब्रेक झाला असेल तर आपण ब्रेकडाउन नंतर सेलिंग करू शकतो.

आता आपण चार्टवर ब्रेकडाउन बघूया.

लाल लॉन्ग कॅण्डल | Red Long Candle

आपण वर दिलेल्या इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स च्या डेली चार्टवर बघू शकतात कि एक लाल लॉन्ग कॅण्डलने स्टॉक मध्ये २५८ च्या जवळचा आपला सपोर्ट ब्रेक केला आहे आणि स्टॉकमध्ये डाउनट्रेन्डची सुरुवात झाली आहे.

मित्रांनो, माझे काम इथे संपत असून आपले काम सुरु होते आहे.

तुम्हाला आता स्टॉकच्या कॅन्डलस्टिक चार्टचे निरीक्षण करायचं आहे आणि चार्टवर लॉन्ग कॅण्डल मार्क करायच्या आहेत.

चार्टवर लॉन्ग कॅण्डल मार्क केल्यानंतर सपोर्टरेझिस्टन्स लेव्हल मार्क करायच्या आहे.

पुढे स्टॉकच्या किमतीतील सपोर्टरेझिस्टन्स जवळच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायची आहे आणि तुम्हाला सराव करतांना येणाऱ्या शंका मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायच्या आहेत.

मित्रांनो, अशाप्रकारे आपण या लेखात लॉन्ग कॅन्डलची सविस्तर माहिती बघितली, लॉन्ग कॅन्डलचा वापर आपण कसा करू शकतो हे देखील बघितले.

आपल्याला लॉन्ग कॅन्डल विषयी काहीही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

मला आशा आहे कि या लेखातून आपल्याला नक्की उपयुक्त माहिती मिळाली असेल.

आपण आपला अमूल्य वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment