डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Doji Candlestick Pattern in Marathi

3.4/5 - (7 votes)

नमस्कार मित्रांनो,

या लेखात आपण डोजी या अतिशय महत्वपूर्ण कॅन्डलस्टिक पॅटर्नची माहिती बघणार आहोत.

डोजी हा कॅन्डलस्टिकचा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून डोजी कॅन्डलचे विविध प्रकार देखील आहेत.

या लेखात आपण डोजी हा कॅन्डलस्टिक तयार होण्यामागील बाजाराची मानसिकता, डोजी कॅन्डलचा ट्रेडींगसाठी वापर, डोजी कॅण्डल आणि व्हॉल्युम यांतील परस्पर संबंध इ विविध गोष्टी अगदी खोलवर बघणार आहोत.

आपण इन्ट्राडे ट्रेडर किंवा स्विंग ट्रेडर कोणत्याही प्रकारचे ट्रेडर असला तरी आपल्याला या लेखातील माहितीचा नक्की उपयोग होईल तेव्हा हा लेख वाचण्याचे मी आपल्याला आवर्जून सांगेल.

चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया.

डोजी कॅण्डल म्हणजे काय ?

खाली चित्रात मी डोजी कॅण्डल दाखवली आहे.

Doji Candle | डोजी कॅण्डल
Doji Candle | डोजी कॅण्डल

डोजी कॅण्डल अगदी बेरजेच्या चिन्हाप्रमाणे दिसते हे आपल्या लक्षात आलेच असेल.

पैसा झाला मोठा | Paisa zala motha book
पैसा झाला मोठा | Paisa zala motha book

डोजी कॅण्डल कशी तयार होते ?

आपल्याला माहीतच आहे कि प्रत्येक कॅन्डलच्या चार प्राइस लेव्हल असतात.

  • ओपन प्राइस
  • क्लोझ प्राइस
  • हाय प्राइस
  • लो प्राइस

डोजी कॅन्डलचे वैशिष्ट्य म्हणजे डोजी कॅन्डलची ओपन प्राइस आणि क्लोझ प्राइस हि एकच असते.

खाली दिलेल्या चित्रावरून आपल्याला हे अधिक स्पष्ट होईल.

Doji min

हेच सर्व आपण आता एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया.

आपण असं समजूया कि अमुक एका कंपनीचा स्टॉक दिवसाच्या सुरवातीला १०० रुपयाला ओपन झाला आणि दिवस अखेर १०० रुपयाला क्लोझ झाला तर चार्टवर एक डोजी कॅण्डल तयार होईल.

डोजी कॅण्डलचे प्रकार

खालील चित्रात मी डोजी कॅण्डलचे विविध प्रकार दाखवले आहेत.

Types of doji | डोजी कॅण्डलचे विविध प्रकार
  • डोजी कॅण्डल

जेव्हा फक्त ओपन प्राइस आणि क्लोझ प्राइस एकसमान असतात तेव्हा डोजी कॅण्डल तयार होते हे आपण बघितले या प्रकारात कॅन्डलची हाय प्राइस आणि लो प्राइस हि ओपन आणि क्लोझ प्राइस पेक्षा वेगळी असते.

  • लॉन्ग लेग डोजी कॅण्डल

या प्रकारची डोजी सर्वसाधारण डोजी कॅण्डल प्रमाणेच असते मात्र हाय प्राइस आणि लो प्राइस लेव्हल या ओपन आणि क्लोझ प्राइस पासून जास्त अंतरावर असतात.

लॉन्ग लेग डोजी कॅण्डल स्टॉक मध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी दर्शविते.

  • फोर प्राइस्ड डोजी

नावातच सांगिल्याप्रमाणे या डोजीच्या सर्व प्राइस लेव्हल : ओपन प्राइस, क्लोझ प्राइस,हाय प्राइस आणि लो प्राइस समान असतात.

या प्रकारची डोजी कॅण्डल आपल्याला स्टॉकमध्ये अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट लागल्यावर किंवा ज्या स्टॉकमध्ये खूप कमी लिक्विडीटी असते त्या स्टॉकच्या चार्टवर बघायला मिळते.

  • ग्रेव्हस्टोन डोजी कॅण्डल

ग्रेव्हस्टोन म्हणजे कबरीवरचा दगड.

या प्रकारची डोजी एखाद्या कबरीप्रमाणे दिसत असल्याने ग्रेव्हस्टोन डोजी असे नाव दिले आहे.

या प्रकारात डोजींची हाय प्राइस ओपन प्राइस पासून खूप उंचावर असते तर लो प्राइस हि ओपन प्राइस इतकीच किंवा जवळच्या लेव्हलवरच असते.

ग्रेव्हस्टोन डोजी कॅण्डलकडे बघून आपल्या असे लक्षात येते कि स्टॉक मध्ये वरच्या किमतीवर सेलर्स असून स्टॉक मध्ये वरच्या किमतीवर सप्लाय झोन आहे.

  • ड्रॅगनफ्लाय डोजी कॅण्डल

ड्रॅगनफ्लाय म्हणजे खाली चित्रात दाखवलेला किडा होय.

Dragonfly
Dragonfly

ड्रॅगनफ्लाय डोजी या किड्याप्रमाणे दिसत असल्याने या डोजीला ड्रॅगनफ्लाय डोजी असे म्हणतात.

या प्रकारात डोजीची लो प्राइस तिच्या ओपन प्राइस पासून खूप खाली असते तर हाय प्राइस हि ओपन प्राइस इतकीच किंवा जवळच्या लेव्हलवरच असते.

या डोजी कॅण्डलवरून आपण असे म्हणू शकतो कि स्टॉक मध्ये डिमान्ड तयार होत आहे.

डोजी कॅण्डल चार्टवर

आता आपण डोजी कॅण्डल चार्टवर बघणार आहोत.

खाली आपल्यासोबत इंडीया बुल हाउसिंग फायनान्स कंपनीचा डेली कॅण्डल चार्ट आहे.

Doji on chart min

आपण बघू शकतो कि चार्टवर तयार झालेल्या कॅन्डलची ओपन प्राइस आणि क्लोझ प्राइस हि एकच आहे म्हणजेच २२० आहे.

एव्हाना तुम्हाला डोजी कॅन्डलची पुरेशी माहिती झाली असेल अशी मी आशा करतो.

डोजी कॅण्डल आणि शेअर मार्केटमधील मानसिकता

मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे बुल्स आणि बेअर्स मधील नेहमी चालणारी लढाई होय.

चार्टवर डोजी तयार झाली म्हणजे बाजारात कुठलाही ट्रेण्ड नसल्याचे स्पष्ट होते किंवा बाजार कोणत्या दिशेला जाईल याबाबत पूर्णपणे अनिश्चितता असल्याचे स्पष्ट होते.

डोजी कॅण्डल तयार होत असताना बुल्स स्टॉकची किंमत पूर्ण ताकदीनिशी वर ढकलण्याचा प्रयत्न करत असतात तर बेअर्स स्टॉकची किंमत खाली खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात.

या युद्धात विजय किंवा पराभव मात्र कोणाचाही होत नाही म्हणून फक्त एकट्या डोजी कॅन्डलला फारसं महत्व नाही.

आपल्याला शेअर बाजारात यशस्वी व्हायचं असेल तर आपण नेहमी जिंकणाऱ्या बाजूला असणे गरजेचे आहे यालाच आपण शेअर मार्केटच्या भाषेत ट्रेण्ड फॉलो करणे म्हणतो.

डोजी कॅण्डल आणि व्हॉल्युम

मित्रांनो चार्टवर जर डोजी कॅण्डल तयार होतांना व्हॉल्युम देखील खूप जास्त वाढला असेल तर मोठ्या प्रमाणावर व्होलॅटिलिटी कॉम्प्रेशन होत असल्याचे आपण म्हणू शकतो.

जर आपल्याला असा पॅटर्न अपट्रेन्ड किंवा डाउनट्रेंण्ड मध्ये आढळला तर आपल्याला फक्त निरीक्षणातून किमतीची हालचाल आणि व्हॉल्युम सुसंगत नसल्याचे लक्षात येते आणि आपण त्यानुसार आपला निर्णय घेऊ शकतो.

Doji and volume

खालील पॅटर्न चार्टवर आढळल्यास ट्रेण्ड बदलण्याची शक्यता अधिक दाट असते आणि या पॅटर्न नंतरच्या सेशनमध्ये आपल्याला मोठी मुव्ह बघायला मिळण्याची सुद्धा शक्यता अधिक असते.

डोजी कॅण्डलचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा ?

डोजी कॅन्डलची सविस्तर माहिती तर आपण बघितली आता आपण मुख्य मुद्याकडे वळूया तो म्हणजे डोजी कॅन्डलचा वापर ट्रेडींगसाठी कसा करावा.

डोजी कॅन्डलचा वापर डोजी चार्टवर कुठे तयार होते यावर अवलंबून असतो.

डोजीकडे मुख्यतः एक ट्रेण्ड रिव्हर्सल पॅटर्न म्हणून बघितले जाते.

म्हणजे अपट्रेंड चालू असतांना डोजी कॅण्डल तयार झाल्यास आता अपट्रेन्ड संपून डाउनट्रेंण्ड सुरु होणार असल्याचा अंदाज बांधला जातो तर याउलट डाउनट्रेंण्ड चालू असतांना डोजी कॅण्डल तयार झाल्यास आता डाउनट्रेंण्ड संपणार असल्याची शक्यता वर्तविले जाते.

असे असले तरी आपण ट्रेड घेण्यापूर्वी ट्रेण्डचे कन्फर्मेशन घेणे अधिक योग्य ठरते कारण शेअर मार्केटमधील प्रत्येक चुकलेल्या ट्रेडसाठी आपल्याला रोख किंमत मोजावी लागत असते.

५ मी टाइमफ्रेमवर डोजी कॅण्डल अगदी सर्रास आढळत असल्याने मी इथे इन्ट्राडेसाठी उपयुक्त असणारे उदाहरण घेतले आहे असे असले तरी या पद्धतीने आपण कोणत्याही टाइमफ्रेमवर ट्रेड घेऊ शकतो.

हे सर्व आपण आता चार्टवरच बघूया.

खाली आपल्यासोबत वेदान्ता कंपनीचा ५ मी टाइमफ्रेमचा चार्ट आहे.

आपण बघू शकतो चार्टवर एक मोठी बेअरिश मूव्ह आली आहे आणि त्यानंतर डोजी कॅण्डल तयार झाली आहे.

डोजी कॅण्डल तयार झाल्यानंतर स्टॉक मधील पडझड थांबली आहे शिवाय कॅण्डलला तयार होणाऱ्या मोठ्या टेल आपल्याला स्टॉक मध्ये डिमान्ड दाखवत आहे.

Doji Bullish reversal

यानंतर अगदी वर जाऊन क्लोझ होणारी एक मोठी हिरवी कॅण्डल अपट्रेंड सुरु होणार असल्याचा बुलिश सिग्नल देत आहे.

त्यानंतर स्टॉक मध्ये आलेल्या मोठ्या बुलिश मुव्हच सर्व चित्र आपल्यासमोर आहे.

आता आपण एक बेअरिश रिव्हर्सल बघूया

आपल्यासोबत टाटा मोटर्स कंपनीचा ५ मी चा चार्ट आहे.

Doji reversal

आपल्याला बघताक्षणीच स्टॉक अपट्रेन्ड मध्ये असल्याचे लक्षात येते मात्र डोजी तयार झाल्यानंतर अपट्रेन्ड काही काळ थांबल्यासारखे दिसते आहे.

पुढच्या वेळी जेव्हा स्टॉक पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळी एक डार्क क्लाउड पॅटर्न तयार झाला आहे आणि स्टॉक खाली कोसळला आहे.

मित्रांनो अशाप्रकारे आपण डोजी कॅन्डलचा वापर ट्रेण्ड रिव्हर्सल ओळखण्यासाठी करू शकतो आणि चांगला प्रॉफिट कमावू शकतो.

इथे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कि चार्टवर डोजी कॅण्डल तयार झाली म्हणजे ट्रेण्ड रिव्हर्स होईलच असे नाही त्यामुळेच आपल्याला कन्फर्मेशन मिळेपर्यंत वाट बघायची आहे आणि नंतरच ट्रेडमध्ये एन्ट्री घ्यायची आहे.

याशिवाय डोजी कॅण्डल सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेव्हल जवळ तयार झाल्यास डोजी कॅन्डलचा वापर अधिक प्रभावीपणे करता येऊ शकतो.

तसेच आपण ट्रेन्डचे कन्फर्मेशन घेतांना व्हॉल्यूमचा देखील नक्की विचार करावा जेणेकरून आपला ट्रेड यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढू शकेल.

मित्रांनो, अशा प्रकारे या लेखात आपण डोजी कॅन्डलची संपूर्ण माहिती घेतली.

आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आपण कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.

अशीच माहिती मिळवण्यासाठी पैसा झाला मोठा चे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा.

आपण आपला किमती वेळ हा लेख वाचण्यासाठी दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment