ऑपशन्स ट्रेडिंग मराठी । Options Trading in Marathi

3.5/5 - (13 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.

सध्या शेअर मार्केटमध्ये ऑपशन्स ट्रेडिंगची खूप जास्त क्रेझ आहे.

ऑपशन्स ट्रेडिंग म्हणजे अतिशय कमी भांडवल वापरून भरपूर नफा कमवण्याचा मार्ग होय.

या लेखात आपण ऑपशन्स ट्रेडिंग म्हणजे काय हे समजून घेण्याची सुरुवात करणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया

ऑपशन्स म्हणजे काय ? | What is Options in Marathi?

ऑप्शन हा एक इंग्रजी शब्द असून त्याचा मराठीत अर्थ पर्याय असा होतो.

मित्रांनो, ऑपशन्स हा ट्रेडिंगचा प्रकार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील अनेकदा वापरत असतो.

ऑपशन्स ट्रेडिंग म्हणजे माल खरेदी करण्यासाठी आगाऊ पैसे देण्याचाच प्रकार आहे.

आगाऊ पैसे देण्याला आपण ॲडव्हान्स असे म्हणतो याशिवाय ‘ईसार‘ हा अतिशय लोकप्रिय शब्द देखील आपण नक्कीच ऐकला असेल.

ईसार दिल्यावर पूर्ण किंमत देऊन माल खरेदी करायचा कि नाही हा पर्याय आपल्यासाठी खुला असतो म्हणून अशा प्रकारच्या ट्रेडींगला ऑपशन्स असे नाव दिले आहे.

कोणत्याही व्यवहारात ईसार देण्यापूर्वी आपण मालाची एकूण किंमत ठरवून घेत असतो आणि त्यानंतरच आपण ईसार देतो.

म्हणजेच ईसार देऊन खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात करार केला जातो.

व्यवहाराच्या नियमानुसार ईसार दिल्यानंतर माल खरेदी करणे आपल्याला बंधनकारक असते किंवा आपण माल खरेदी न केल्यास आपल्याला आपली ईसार दिलेली रक्कम परत मिळत नाही.

माल खरेदी न केल्यास आपली आगाऊ रक्कम बुडते.

आता दुसरी बाजू बघूया.

ईसार घेतल्यानंतर विक्रेत्याला ठरलेला माल अगोदरच आपापसांत ठरलेल्या किमतीला विकणे बंधनकारक असते.

अशाप्रकारे खरेदीदार आणि विक्रेते दोघानांही आपली बाजू काही प्रमाणात सुरक्षित करता येते.

खरेदीदार ईसार देऊन मालाची किंमत सुरक्षित करून घेतात शिवाय उर्वरित रक्कम देण्यासाठी त्यांना अवधी देखील उपलब्ध असतो.

भविष्यात मालाची किंमत वाढली तरी खरेदीदाराला ठरलेल्या किमतीलाच माल मिळतो.

विक्रेते आपला माल विकण्याच्या दृष्टीने सुरक्षित करून घेतात शिवाय खरेदीदाराने माल विकत न घेतल्यास विक्रेत्याला ईसार मिळतो आणि फायदा होतो.

उदा. काही वर्षांपूर्वी मी घराचे बांधकाम केले होते.

बांधकाम करतेवेळी मी सिमेंटच्या ५०० गोण्या २०० रुपये भावाने बुक करून ठेवल्या होत्या ज्यांची एकूण किंमत होते १,००,००० रुपये.

मात्र मला पूर्ण ५०० गोण्याची एकाचवेळी गरज पडणार नव्हती शिवाय एवढ्या गोण्या सांभाळणे अवघड काम होय.

तेव्हा मी दुकानदाराला २०,००० रुपये देऊन गोण्या बुक करून घेतल्या आणि नंतर गरज पडेल तशा गोण्या पैसे देऊन घेऊन आलो.

माझ्या घराचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा सिमेंटचा भाव २५० रुपये/गोणी एवढा झाला होता मात्र मी अगोदरच पैसे दिले असल्याने मला सर्व सिमेंट २०० रुपये /प्रति गोणी या भावानेच मिळाले.

अशाप्रकारे मला ॲडव्हान्स दिल्याने या व्यवहारात फायदा झाला याउलट दुकानदाराला एकाचवेळी ५०० गोण्यांची मोठी ऑर्डर मिळाल्याने त्याचा देखील फायदा झाला असेलच.

मित्रांनो, ऑपशन्स हि गोष्ट काही आजची नाही बरं का, ऑपशन्सचा इतिहास देखील खूप मनोरंजक आहे.

चला तर मग बघूया ऑपशन्सचा इतिहास

ऑपशन्सचा इतिहास ? | History of Options in Marathi?

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल कि ऑपशन्सची सुरुवात इसवी सन पूर्वी झाली आहे.

ग्रीक देशातील, मिलेटसचा थेल्स हा पहिला प्रसिद्ध ऑप्शन्स बायर होय.

थेल्स हा एक गणिततज्ञ आणि विचारवंत होय.

त्याकाळात एके वर्षी ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून आणि आकडेमोड करून थेल्स याने अंदाज केला कि ऑलिव्हचे (एक प्रकारच्या तेलबिया) या वर्षीचे पीक भरपूर येणार आहे.

अर्थातच या तेलबियांच्या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर ऑइल मिल किंवा घाण्यांची गरज पडेल.

अशावेळी मग थेल्सने आपल्या परिसरातील सर्व तेलाची घाणी तयार करणाऱ्या कारागिरांशी संपर्क करून घाण्यांची खरेदी करण्यासाठी ईसार देऊन सर्व घाणी बुक करून ठेवल्या.

थेल्सच्या अंदाजाप्रमाणे त्यावर्षी ऑलिव्हचे भरपूर उत्पादन आले मात्र प्रक्रिया करण्यासाठीच्या मिल्स मात्र ईसार दिल्यामुळे थेल्सच्या मालकीच्या झाल्या होत्या.

नंतर मग थेल्सने या ऑइल मिल्स भाड्याने देऊन आणि विकून भरपूर पैसा कमावला.

अशाप्रकारे थेल्स पासूनच ऑपशन्स ट्रेडिंगची सुरुवात झाली असे म्हणतात.

कॉल म्हणजे काय ? | What is Call in Marathi?

ऑप्शन्स मार्केटमध्ये काम करायचे झाल्यास आपल्याला कॉल आणि पुट समजून घेणे गरजेचे आहे.

पुट आणि कॉल्स हे ऑप्शन्स मार्केटमधील करारांचे प्रकार आहेत.

खरेदीदार आणि विक्रेते यांच्यांतील करारांना शेअर मार्केटच्या भाषेत काँट्रॅक्टस असे म्हणतात.

म्हणजेच बायर्स आणि सेलर्स यांच्यातील काँट्रॅक्टसला ऑप्शन्स असे म्हणतात.

कॉल म्हणजे खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट किंवा तेजीचे कॉन्ट्रॅक्ट होय.

जेव्हा आपल्याला एखाद्या शेअरची प्राइस वाढेल असे वाटत असते तेव्हा आपण कॉल कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो.

आपल्या अगदी विरुद्ध काही ट्रेडर्सला शेअरची प्राइस वाढणार नाही असे वाटत असते ते ट्रेडर्स असे काँट्रॅक्टस विकत असतात.

ऑप्शन्स काँट्रॅक्टस विकणाऱ्या ट्रेडर्सला ऑप्शन सेलर्स किंवा ऑप्शन रायटर्स असे म्हणतात.

पुट म्हणजे काय ? | What is Put in Marathi?

पुट म्हणजे मंदीचे कॉन्ट्रॅक्ट होय.

जेव्हा आपल्याला एखाद्या शेअरची प्राइस कमी होईल असे वाटत असते तेव्हा आपण पुट कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो.

ज्या ट्रेडर्सला शेअरची प्राइस कमी होणार नाही असे वाटत असते ते ट्रेडर्स असे पुट काँट्रॅक्टस विकत असतात.

कॉन्ट्रॅक्ट खरेदी करण्यासाठी आपण जी रक्कम मोजतो त्याला शेअर मार्केटच्या भाषेत प्रिमिअम असे म्हणतात.

मित्रांनो, ऑप्शन्सच्या या काँट्रॅक्टसचा एक ठराविक कालावधी असतो ज्याला आपण एक्स्पायरी असे म्हणतो.

ऑप्शन्स काँट्रॅक्टसच्या दोन प्रकारच्या एक्स्पायरी असतात साप्ताहिक (विकली) आणि मासिक (मंथली).

आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे ऑप्शन्स विषयी अधिकाधिक माहिती घेत राहू.

शेअर मार्केट आणि फन्डामेन्टल ॲनालिसिस विषयी अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘पैसा झाला मोठा’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘पैसा झाला मोठा’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘पैसा झाला मोठा’ला फॉलो करा.

आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास, किंवा शंका असल्यास आपण मला जरूर कळवा.

मी यथाअवकाश, यथाशक्ती आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद!!!

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5
चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment